दिवाळीच्या निमित्तानं प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांवरही यंदा कोरोनाचा परिणाम

पुणे, ३ नोव्हेंबर २०२० : दरवर्षी दिवाळीच्या निमित्तानं प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांवरही यंदा कोरोनाचा परिणाम दिसत असून राज्य शासनाकडे सुमारे दीड हजार दिवाळी अंकांची नोंदणी असली तरी यावर्षी अवघे १०० च्या आसपासच दिवाळी अंक प्रकाशित होऊन बाजारात विक्रीला येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अनेक नामांकित दिवाळी अंक यंदा केवळ आर्थिक कारणामुळं प्रकाशित होणार नाहीत. दिवाळी अंकाचं संपूर्ण आर्थिक गणित जाहिरातींवरच अवलंबून असतं आणि यंदा कोरोना प्रादुर्भावाचा जबर फटका सर्वच व्यावसायिकांना बसला असल्यानं जाहिरात क्षेत्राकडून दिवाळी अंकांसाठी फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अनेक प्रमुख प्रकाशकांनी दिवाळी अंकच प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिवाळी अंक संपादक संघटना अर्थात दिवा चे उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे यांनी काल सांगितलं.

स्टॉलवर येऊन दिवाळी अंक खरेदी करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपराही यंदा कोरोना प्रादुर्भावामुळं खंडित होण्याची शक्यता असून दिवाळी अंक प्रदर्शनावरही या साथीचा परिणाम दिसून येणार असल्याचं प्रकाशक संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनामुळे यंदा दिवाळी विशेषांकाची निर्मिती आणि वितरणावर परिणाम होणार असला तरी वाचकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन छापील अंक अधिकाधिक वाचकांना उपलब्ध व्हावेत, यासाठी अखिल भारतीय मराठी नियतकालिक संघटनेनं मात्र पुढाकार घेतला आहे.

पुणे आणि परिसरात किमान १५ ते २० ठिकाणी दिवाळी विशेषांक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. देशभरातील वाचकांना हवे तर ते घरपोच पाठवण्याची व्यवस्थाही उपलब्ध होईल असं संघटनेचे उपाध्यक्ष घनश्याम पाटील यांनी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा