पंढरपुर, १८ नोव्हेंबर २०२० : वाढती गर्दी आणि लोकांची मागणी विचारात घेऊन अनेक मंदिरांना पहिल्या दिवशी भाविकांच्या संख्येवर घातलेली बंधनं शिथिल करावी लागताहेत.
पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शनासाठी येणाऱ्या २००० भाविकांना आता दररोज मुखदर्शन घेता येणार आहे. आधी मंदिर प्रशासनानं १००० भाविकांना मुखदर्शन घडवण्याचं नियोजन केलं होतं. मात्र भाविकांची मागणी विचारत घेऊन ही संख्या दुप्पट करण्याचा निर्णय काल घेतला. ऑनलाईन पास मात्र आवश्यकच राहील.
राज्यातली इतर बहुतांश मंदिरं पाडव्यालाच उघडली असली तरी शेगावचं श्री गजानन महाराजांचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी काल खुलं करण्यात आलं. स्वच्छता, नियोजन आणि कर्मचाऱ्यांना कोविड नियमांबाबतच्या सुचनांसंदर्भातलं प्रशिक्षण नीट व्हावं यासाठी मंदिर प्रशासनानं मंदिर उघडण्याची घाई केली नाही. गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी ई पास काढावा लागणार असून आधार कार्डही सोबत बाळगावं लागणार आहे.
मंदिरं बंद असताना त्यावर अवलंबून असणा-यास अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. आता देवळांची दारं उघडली असली तरी काही निर्बंध विचारात घेता हा प्रश्न पूर्णत: सुटेल असं दिसत नाही. अनेक मंदिरांनी भाविकांनी येतांना हार, फुले, प्रसाद, नारळ, चिरंजी, पेढे, उदबत्ती इत्यादी पुजेचं साहित्य सोबत आणू नये असं कळवलं आहे.त्यामुळे या वस्तूंच्या विक्रीवर ज्यांची उपजीविका अवलंबून आहे त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत.
न्यूज अनकट प्रतिनिधी