खंडेरायाच्या गडावर सोमवती यात्रा संपन्न

पुरंदर, १४ डिसेंबर २०२०: अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा आज उत्साहात संपन्न होत आहे. आज सकाळी उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीत स्नान घालण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं सोमावती साजरी करण्यात येत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं आज जेजुरीत होणाऱ्या सोमवती यात्रेसाठी कोणीही भाविकांनी जेजुरीत येऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं होतं. त्यामूळं स्थानिक पुजारी, मानकरीविश्वस्त यांच्या उपस्थितीत ही यात्रा संपन्न होत आहे. सकाळी सहा वाजता मोजके पुजारी, मानकरी , खांदेकरी आणि विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये खंडोबा-म्हाळसादेवी च्या मुर्तींना दहीदुधाचा अभिषेक घालण्यात आला. यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. सजवलेल्या गाडीतून उत्सवमूर्तीना कऱ्हेकाठावर नेण्यात आलं. कऱ्हा नदीच्या पाण्यानं उत्सव मूर्तींना स्नान घालण्यात आलं.

सोमवतीला दरवेळी पालखी वाजत गाजत कऱ्हा नदीवर स्नानासाठी नेली जाते. परंतु, यावेळी कोरोनाच्या सावटामुळं सजवलेल्या गाडीतून उत्सवमूर्तीना कऱ्हेकाठावर नेण्यात आलं. पूजा अभिषेक झाल्यानंतर आरती करण्यात आली. मोजक्याच पुजारी व मानकऱ्यांंच्या उपस्थितीत सोमवती सोहळा पार पडला.

आज पोलीस प्रशासनानं जेजुरी आणि परिसरात जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या देख रेखी खली कडक बंदोबस्त ठेवला होता.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा