इंदापूर, २८ जानेवारी २०२१ : जागतिक कृषी महोत्सव सप्ताहनिमित्त इंदापूर येथे एक दिवसीय जनजागरण जागतिक कृषी महोत्सव २०२१ चे उदघाटन माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गुरुवार दि. २८ जानेवारी रोजी करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) इंदापूर यांच्या वतीने या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संस्कृती, साहित्य प्रदर्शन या माध्यमातून नैसर्गिक शेती, देशी बियाणे, गोसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कृषी जोड- व्यवसाय इत्यादी विषयांचा अंतर्भाव करून हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
हर्षवर्धनजी पाटील म्हणाले,” दर वर्षी नाशिक येथे जागतिक कृषी महोत्सवात लाखो शेतकरी सहभागी होतात परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी थेट बांधावर हे प्रदर्शन घेण्याचे नियोजन केले असल्यामुळे आज इंदापूर येथे कृषी महोत्सवाचे आयोजन केले असून, शेतकऱ्यांसाठी च्या विविध कृषी व संलग्न विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांची माहिती या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे . नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्याशिवाय शेतीची प्रगती होत नसते त्या दृष्टीने हे प्रदर्शन अनेकांना मार्गदर्शक ठरेल .आज कृषी क्षेत्रात पारंपरिक आणि आधुनिक शेती पद्धतीची जोड देऊन प्रयोग करण्याची गरज आहे. शेती पूरक जोडधंदा करणे ही काळाची गरज असून कृषी महोत्सव त्यासाठी प्रेरणा देणारे असतात. कृषीवर आधारित उद्योग व्यवसाय अधिक भर देण्याची आवश्यकता आहे.
यावेळी दुधगंगा वाहतूक संघाचे चेअरमन रघुनाथ राऊत, माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, प्रदीप भगत, बाळासाहेब पाटील, युवराज राऊत उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : निखिल कणसे