बारामती, २९ जानेवारी २०२१: धीरज जाधव क्रिकेट अॅकॅडमीने बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित केलेली महिला प्रीमियर लीग टी २० स्पर्धा काल पासून(ता.२८) सुरु झाली. उद्घाटनाच्या सामन्यात कर्णधार पार्वती बाकळे हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पीडीसीए (पुणे जिल्हा क्रिकेट संघटना) संघाने सारा क्रिकेट अॅकॅडमी संघाचे कडवे आव्हान तीन चेंडू राखून परतावून लावले. साराने ५ बाद १३४अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती.
उदघाटनाच्या सामन्यात पार्वतीने स्वाती शिंदे आणि श्रुती भांबुर्डेकर यांना प्रत्येकी दोन चौकार मारले आणि विजय आवाक्यात आणला. साराच्या श्रुती भांबुर्डेकरने सलामीला येत नाबाद अर्धशतकी खेळी करीत लक्षवेधी कामगिरी नोंदविली. दुसऱ्या सामन्यात पीवायसीने श्री स्वामी समर्थ क्रिकेट अॅकॅडमीवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविला.
स्वामी समर्थ अॅकॅडमीचा नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय अपयशी ठरला.अखेरच्या षटकापूर्वी त्यांचा डाव ७२ धावांत आटोपला. गोलंदाज स्वाती शिंत्रे हिने १४ धावांत चार विकेट घेतल्या. पीवायसीकडून मनाली कुलकर्णी-प्रगती धावडे यांनी ५९ धावांची सलामी देत विजय औपचारीक ठरविला.
आमदार रोहित पवार यांच्याहस्ते आणि बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिक्षक नारायण शिरगावकर यांच्या मुख्य उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन झाले. धीरज जाधव यांनी स्वागत केले. ग्रामीण भागातही क्रिकेटपटू तयार व्हावेत या साठी धीरज जाधव यांची पवार यांनी प्रशंसा केली. औपचारीक उद्घाटनापूर्वी रोहित पवार यांनी क्रिकेटचा आनंद लुटला. तर स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी बारामतीकरांनी गर्दी केली होती. या स्पर्धेत मान्यवर संघांचा सहभाग असून त्यात पूनम राऊत, मोना मेश्राम, अनुजा पाटील अशा भारतीय महिला संघाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव