मुंबई, २४ फेब्रुवरी २०२१: दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर मुंबईत मृतावस्थेत आढळले. मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला. यावेळी पोलिसांना त्यांनी लिहिली पंधरा पानांची सुसाईड नोट देखील मिळाली आहे. ही नोट खासदारांसाठी असलेल्या लेटरहेडवर लिहिली असल्याचं मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. या प्रकरणी आता पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. या तपासासाठी पोलीसांनी एका विशेष पथकाची स्थापना केली आहे. पोलीस सर्व अंगाने या घटनेचा तपास करीत आहेत.
मोहन डेलकर खासदार असल्याने केंद्रीय यंत्रणाही याचा तपास करीत आहे. डेलकर मुंबईत आल्यावर त्यांच्यासोबत त्यांचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर होते. यांचा अजून जबाब नोंदवण्यात आलेला नाही. दरम्यान, मोहन डेलकर यांचा तात्काळ पोस्ट मार्टेम करण्यात आला. यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. परवा घटना घडली आणि नातेवाईक काल डेलकर यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात व्यस्त होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचाही जबाब नोंदवण्यात आलेला नाही.
लवकरच जबाब नोंदवला जाणार
लवकरच या सर्वांचा जबाब नोंदवला जाईल, असे मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. डेलकर यांच्या मृतदेहावर काल पोस्ट मार्टेम करण्यात आल्यावर काही गोष्टी समोर आल्यात. डेलकर यांच्या मृत्यूबाबत दुपारी दोन वाजता पोलिसांना कळालं. मात्र, त्यांनी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आत्महत्या केल्याचं पोस्ट मार्टेमच्या प्राथमिक तपासात उघडकीस आलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे