मुंबई, ९ एप्रिल २०२१: काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या महापौर पेडणेकर यांनी मुंबईत अवघ्या दोन ते तीन दिवस पुरेल एवढीच लस शिल्लक राहिले असल्याचे सांगितले होते. तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील लसींचा साठा संपत आला आहे. इतकेच काय तर देशातील अनेक राज्यांनी देखील केंद्र सरकार कडे लसीच्या कमतरते बाबत तक्रार केली होती. या सर्वात आता मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रांवर लस संपली असल्याचे समोर येत आहे. राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक संसर्गित रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत लसीकरण थांबल्यामुळे प्रशासनासमोर नवीन संकट उभे राहिले आहे.
मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिहगावकर यांनी ट्विट करत कोरोना लस संपलेल्या लसीकरण केंद्रांची माहिती दिली. ट्विटनुसार मुंबईतील वांद्रे बीकेसी कोविड सेंटर, सायन रूग्णालय, सेव्हन हिल हॉस्पिटल, कस्तुरभा रूग्णालय, कूपर हॉस्पिटल, सर्वादय रूग्णालय माहिम, पोदार रूग्णालय, क्रांती सावित्राबाई फुले रूग्णालय याठिकाणी लस उपब्लध नसणार आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधला होता. यावेळी देखील त्यांनी राज्याला लसीची कमतरता भासत असल्याचे नमूद केले होते. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. पुण्यामध्ये देखील अनेक केंद्रांवर लस संपल्या आहेत. पिंपरी-चिंचवडमधील लसीकरण केंद्रांवरही काल पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक होता. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, पनवेलमध्ये लसीअभावी कोरोना लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे.
आरोग्यमंत्र्यांची तातडीची बैठक
दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या ७ कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची काल बैठक घेतली. राज्यात रेमडेसिव्हीरची कमतरता भासू नये यासाठी उत्पादन दुप्पट करावे. रुग्णालयात रेमडेसिव्हीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमण्यात यावेत. उत्पादक कंपन्यांनी थेट शासकीय रुग्णालये आणि जिल्हाधिकाऱ्यांनाच इंजेक्शनचा पुरवठा करावा. तसंच काळाबाजार होऊ नये म्हणून एमआरपी कमी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. या बैठकीला अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे