कोरोनाचे राजकारण करणाऱ्यांना समज द्या, उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

मुंबई, ९ एप्रिल २०२१: कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि नाही असे ठामपणे सांगतानाच कोरोना लढ्यात कु ठलेही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत, असा विश्वास देताना लसीचा जादा पुरवठा करावा, तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन तसेच व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून द्यावे, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि लसीकरणावरून केंद्र आणि राज्यात सुरू झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत महाराष्ट्राची बाजू जोरदारपणे मांडताना राज्यात भाजप करीत असलेल्या राजकारणाबाबत नाराजी व्यक्त केली आणि स्थानिक नेत्यांना समज देण्याची विनंती केली.
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना आरटीपीसीआर चाचण्या ७० टक्यांपेक्षा जास्त करुन आणि लसीकरण आणखी जास्त गतीने वाढवू असे सांगितले. मात्र त्यासाठी त्यांनी केंद्राचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राधान्यक्रम गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी दर आठवड्यात ४० लाख लसींचा पुरवठा करावा. आत्तापर्यंत राज्याला १ कोटी ६ लाख २३ हजार ५०० डोसेस मिळाले आहेत. आजपर्यंत ९२ ते ९५ लाख डोस देण्यात आले आहेत. आता या घडीला महाराष्ट्राकडे खूप कमी साठा असून काही लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. १५ एप्रिलनंतर १७.४३ लाख डोसेस देण्यात येतील, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं. मात्र त्यामुळे लसीकरण मोहिमेत खंड पडेल. अशावेळी आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा