हेडिंग्ले, २८ ऑगस्ट २०२१: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जात आहे. लिड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळालं. कोणतीच घाई न करता संयमानं खेळ करत भारतीय संघानी इंग्लंडला उत्तर दिले आहे. तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस २ बाद २१५ धावांपर्यंत भारताने मजल मारली. भारत अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर आहे. केएल राहुल स्वस्तात बाद झाल्यानंतर रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी भारताची पिछाडी कमी केली. तिसऱ्या दिवसअखेर पुजारा १५ चौकारांसह ९१ तर विराट ६ चौकारांसह ४५ धावांवर नाबाद होते.
आजच्या दिवसाची सुरुवात भारतीय गोलंदाजांनी चांगली केली. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये इंग्लंडचे उर्वरीत फलंदाज बाद करुन इंग्लंडचा डाव ४३२ धावांवर संपवला. भारताकडून या डावात मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जाडेजा या तिघांनी प्रत्येकी २ बळी घेत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला.
दुसऱ्या डावात रोहित व लोकेशनं आश्वासक सुरुवात करत काही सुरेख फटके मारले. लोकेशला अम्पायरनं पायचीत बाद दिले होते, पंरतु त्यानं लगेच रिव्ह्यू घेतला आणि त्यामुळे तो वाचला. पण, त्याचा फायदा उचलण्यात तो अपयशी ठरला. लंच ब्रेक होण्यापूर्वीच्या षटकात लोकेश ८ धावांवर माघारी परतला. रोहित व चेतश्वर पुजारा या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी १७३ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून टीम इंडियाचा डाव सावरला.
रोहितनं २०२१मधील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. पण, ४८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहितसाठी LBWची अपील झाली, मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले. याविरोधात हिटमॅननं DRS घेतला. त्यात चेंडू यष्टिंना चुकवून जात असल्याचे दिसत होते. फक्त umpires call मुळे रोहितला बाद ठरवण्यात आले. रोहित १५६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५९ धावांवर माघारी परतला.
रोहितनंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला. त्याने पुजारासोबत ९९ धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर पुजाराचे अर्धशतक झाले. पुजारा ९१ धावांवर खेळत आहे. तर विराट ४५ धावांवर नाबाद आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे