ओव्हल, ६ सप्टेंबर २०२१: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. ओव्हल कसोटीच्या पाचव्या दिवशी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. कारण चौथ्या दिवसाच्या अखेरीस सामना दोलायमान अवस्थेत आहे. त्यामुळे आज कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने ३२ षटकात बिनबाद ७७ धावा केल्या आहेत. इंग्लंडला आज शेवटच्या दिवशी विजयासाठी २९१ धावांची गरज आहे.
यापूर्वी तत्पूर्वी भारताने इंग्लंडला आपल्या दुसऱ्या डावात ४६६ धावा करत चोख प्रत्युत्तर दिले. रोहित, राहुल आणि पुजारा यांच्या योगदानानंतर मुंबईकर फलंदाज शार्दुल ठाकूर आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी केली. भारताच्या तळाच्या फलंदाजांनी इंग्लंडला नामोहरम केले. ही कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत आहे.
शार्दुल ठाकूर आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध रविवारी चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात ४६६ धावा केल्या. शार्दुल ठाकूरने ७२ चेंडूत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६० धावा आणि ऋषभ पंतने १०६ चेंडूत चार चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने तीन, ओली रॉबिन्सन आणि मोईन अलीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर जेम्स अँडरसन, कर्णधार जो रूट आणि क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी केली.
या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने चांगली सुरुवात केली आहे. इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी संयत खेळत करत भारताला चोख उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताने यावेळी दोन विकेट्स मिळवल्या असत्या तर त्यांच्या बाजूने हा सामना झुकू शकला असता. पण इंग्लंडला रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद यांनी चौथा दिवस खेळून काढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद ७७ अशी मजल मारली आहे. त्यामुळे आता सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी २९१ धावांची गरज आहे, त्याचबरोबर भारताला विजय मिळवायचा असेल तर त्यांना १० विकेट्स काढाव्या लागतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे