मुंबई, 31 जानेवारी 2022: ‘जोडी स्वर्गात नाही तर नरकात बनतात’, अशी टिपण्णी मुंबई उच्च न्यायालयाने घरगुती वादाच्या सुनावणीदरम्यान केली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर एका पतीनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती, ज्यामध्ये पत्नीने क्रूरता आणि हुंडा मागितल्याचा आरोप केला होता आणि विवाहित जोडपं एकत्र राहण्यास तयार नव्हतं.
पती-पत्नीनं एकमेकांविरुद्ध क्रॉस तक्रारी केल्या असल्याचं न्यायालयाने निरीक्षण केलं, न्यायमूर्ती एसव्ही कोतवाल यांनी आदेशात म्हटलंय, “एफआयआर दर्शविते की पती-पत्नी एकत्र राहू शकत नाहीत. त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती.” या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती कोतवाल यांनी ‘जोड्या स्वर्गात नव्हे तर नरकात बनतात’, अशी संतप्त टिप्पणीही केली.
प्रकरण असं आहे की एका महिलेनं डिसेंबर 2021 मध्ये तिच्या पतीविरुद्ध एफआयआर दाखल केला होता आणि आरोप केला होता की, 2017 मध्ये त्यांच्या लग्नादरम्यान पतीच्या कुटुंबाला त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्यासाठी एक सोन्याचे नाणं हवं होतं. महिलेच्या कुटुंबीयांची मागणी पूर्ण होऊ न शकल्यानं सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. पत्नीनं दावा केला की हे जोडपं त्यांच्या 3 वर्षांच्या मुलासह राहत होते तो फ्लॅट खरेदी करण्यासाठी तिने 13,50,000 रुपये दिले. पत्नीनं मारहाण केल्याचं दाखवण्यासाठी पतीनं स्वतःवर काही जखमा केल्याचा आरोपही तिनं केलाय.
दुसरीकडं पतीनं फ्लॅटसाठी 90,00,00 रुपये कर्ज घेतल्याचा आरोप आहे आणि लग्नानंतर तो पत्नीला मॉरिशसला घेऊन गेला आणि तिला एक महागडा मोबाईलही भेट दिला. त्यानं काही व्हॉट्सअॅप चॅटद्वारे कोर्टाला सांगितलं की, त्याच्या पत्नीकडून त्याचा सतत छळ होत आहे. पतीनं पत्नीविरुद्ध तक्रार केल्याचा आरोप केला असून, प्रत्युत्तर म्हणून पत्नीनंही पतीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
न्यायमूर्ती कोतवाल म्हणाले, दोन्ही पक्षांचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालय या निष्कर्षाप्रत पोहोचलं की, पतीला ताब्यात घेतल्यानं प्रश्न सुटणार नाही. तपासाच्या उद्देशानंही त्या व्यक्तीची कोठडीत चौकशी करणे आवश्यक नाही. त्याला तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास सांगितलं जाऊ शकतं.
आरोप-प्रत्यारोप आहेत, ज्याचा निर्णय केवळ खटल्याच्या वेळीच होऊ शकतो. अटक झाल्यास पतीला एक किंवा अधिक जामीनदारांसह 30 हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात यावं, असं निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे