नवी दिल्ली, 1 एप्रिल 2022: सध्या, एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करणे चुटकीसरशी केले जाते. मात्र, पोस्ट ऑफिसच्या खात्यातून बँक खात्यात पैसे वळवायचे झाल्यास लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. आता या समस्या लवकरच संपणार आहेत. सध्या ज्या पद्धतीने दोन बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले जातात, त्याच पद्धतीने पोस्ट ऑफिस आणि बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करता येतील, अशी सरकारची तयारी आहे.
सरकारने लोकसभेत दिली ही माहिती
दळणवळण राज्यमंत्री (MoS संचार) देवुसिंह चौहान यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. टपाल आणि बँक खात्यांमध्ये पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करण्याच्या मंजुरीबाबत मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना मंत्री म्हणाले की, पोस्ट ऑफिस खात्यातून बँक खात्यात आणि बँक खात्यातून पोस्ट ऑफिस खात्यात ऑनलाइन पैसे हस्तांतरित करण्यासाठी सरकार एनईएफटी आणि आरटीजीएस प्रदान करेल. या दिशेने काम करत आहे.
कोअर बँकिंगशी जोडलेले आहेत बहुतेक पोस्ट ऑफिस
कॅबिनेट मंत्र्यांनी असेही सांगितले की आतापर्यंत देशातील एकूण पोस्ट ऑफिसपैकी 1,52,514 कोअर बँकिंग प्रणाली अंतर्गत आणले गेले आहेत. देशभरात सध्या 1,58,526 पोस्ट ऑफिस आहेत. याचा अर्थ असा की आता फक्त 6,012 पोस्ट ऑफिस उरले आहेत, जी अद्याप कोअर बँकिंग प्रणालीशी जोडलेली नाहीत.
या योजनांचा विचार सुरू
चौहान म्हणाले की, सरकार इंटरमीडिएट डेटा रेट कनेक्टिव्हिटी (IDR), व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क कनेक्शन (VPN) आणि व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल कनेक्टिव्हिटी (VSAT) द्वारे कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी पावले उचलत आहे. याशिवाय, ग्रामीण आणि डोंगराळ भागात असलेल्या पोस्ट ऑफिससाठी सबस्क्राइबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल (सिम) आधारित हॅन्डहेल्ड डिव्हाइसेस आणि पॉइंट ऑफ सेल (पीओएस) डिव्हाइसेस प्रदान करण्याची योजना आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे