नवी दिल्ली, 9 एप्रिल 2022: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी देशाच्या पतधोरणाचा आढावा सादर केला. चालू आर्थिक वर्षाच्या या पहिल्या आर्थिक आढाव्यात, मध्यवर्ती बँकेने रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर म्हणजेच धोरणात्मक व्याजदर अपरिवर्तित ठेवले आहेत. रेपो दर 4% वर अपरिवर्तित आणि रिव्हर्स रेपो दर 3.35% वर कायम आहे. त्याच वेळी, RBI ने मौद्रिक धोरणाबाबत आपली भूमिका बदललेली नाही आणि ती लवचिक ठेवली आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची (एमपीसी) बैठक बुधवारी सुरू झाली.
16.2% असेल विकास दर
मोनेटरी पॉलिसी मध्ये धोरणात्मक दर अपरिवर्तित ठेवण्याबरोबरच, RBI ने चालू आर्थिक वर्षातील देशाच्या आर्थिक विकास दराचा अंदाज कमी केला आहे. पहिल्या तिमाहीत ते 16.2%, दुसऱ्या तिमाहीत 6.2%, तिसऱ्या तिमाहीत 4.1% आणि चौथ्या तिमाहीत 4% असू शकते. संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशाचा आर्थिक विकास दर 7.2% राहण्याचा अंदाज आहे.
महागाई जास्त राहील
चालू आर्थिक वर्षातही महागाईचा दर उच्च राहण्याचा अंदाज मध्यवर्ती बँकेने व्यक्त केला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात हा दर 5.7% राहण्याचा अंदाज आहे. पहिल्या तिमाहीत महागाई दर 6.3%, दुसऱ्या तिमाहीत 5%, तिसऱ्या तिमाहीत 5.4% आणि चौथ्या तिमाहीत 5.1% असणार आहे.
महागाईचा दर वरच्या बाजूला राहिला आहे. पण गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणतात की हे रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्यात आहे. रिझव्र्ह बँकेने महागाई दर 4 टक्क्यांच्या श्रेणीत ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यात 2% चढ-उतार होऊ शकतात.
मे 2020 मध्ये बदलण्यात आले दर
रिझर्व्ह बँकेने 11व्यांदाही पतधोरण दर समान पातळीवर ठेवले आहेत. याआधीच्या 10 बैठकांनंतरही रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटचे धोरणात्मक व्याजदर अपरिवर्तित ठेवण्यात आले होते. RBI ने 22 मे 2020 रोजी रेपो दरात शेवटची कपात केली होती, तेव्हापासून तो 4% च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर राहिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे