अग्निपथ: 13 राज्यात गदारोळ, 1 मृत्यू, आज बिहार बंदची घोषणा, संरक्षण मंत्री घेणार महत्त्वाची बैठक!

नवी दिल्ली, 18 जून 2022: सैन्य भरतीशी संबंधित ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात देशभरात हिंसक निदर्शने सुरू झाली आहेत. यूपी, बिहार, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, राजस्थानसह 13 राज्यांमध्ये हिंसाचाराचा वणवा पोहोचला आहे. सर्वाधिक गोंधळ बिहार आणि नंतर उत्तर प्रदेशात पाहायला मिळत आहे.

बिहारमधील 12 जिल्ह्यांमध्ये 48 तासांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हरियाणातील एका जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट तसेच एसएमएस सेवा 24 तासांसाठी बंद करण्यात आली आहे.

सध्या हिंसाचाराची ही आग कमी होताना दिसत नाही. बिहारमधील अनेक विद्यार्थी संघटनांनी आज राज्यव्यापी बंद पुकारला आहे. ज्याला राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), हिंदुस्थान अवाम मोर्चा (एचएएम) आणि विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) यांनी पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत. अग्निपथ योजनेच्या विरोधाचाही या बैठकीच्या अजेंड्यामध्ये समावेश केला जाऊ शकतो.

यूपीमध्ये सर्वाधिक 260 जणांना अटक

बिहार, हरियाणा आणि तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. पण सर्वाधिक अटक उत्तर प्रदेशात झाली आहे. यूपीच्या 4 जिल्ह्यांमध्ये आंदोलकांवर 6 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. 260 जणांना अटक करण्यात आली आहे.

यूपीमधील बलिया येथून 109, मथुरा येथून 70, अलीगढमधून 30, आग्रा येथून 9, वाराणसी आयुक्तालयातून 27 आणि नोएडा येथून 15 जणांना अटक करण्यात आली आहे. अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आले आहे. बलियामध्येही 2 दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे.

बिहार : 650 विरुद्ध खटला

अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारमध्येच सर्वाधिक निदर्शने होत आहेत. शुक्रवारी नालंदा येथील इस्लामपूर रेल्वे स्थानकावर मगध एक्स्प्रेसच्या 4 बोगींना आग लागली. आराह येथील कुल्हाडिया स्टेशनवर ट्रेन जाळण्यात आली.

बिहिया रेल्वे स्थानकावरील तिकीट काउंटरवरून सुमारे 3 लाख रु. लुटले गेले. 650 हून अधिक अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी मोतिहारीमध्ये 23 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. समस्तीपूर आणि दरभंगा येथे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

दिल्ली ते हिमाचलपर्यंत निदर्शने

दिल्लीतही शुक्रवारी आयटीओच्या मेट्रो गेटवर AISA कामगारांनी निदर्शने केली.

महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये दिल्ली ते कोलकाता यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-2 वर टायर जाळण्यात आले.

राजस्थानमधील चित्तोडगडमध्ये सैन्य भरतीची तयारी करत असलेले तरुण एकत्र आले आणि त्यांनी योजना मागे घेण्याची मागणी केली.

हरियाणातील गुरुग्राममध्ये कलम 144 लागू. फरीदाबादच्या बल्लभगडमध्ये 24 तास इंटरनेट सेवा बंद. 65 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

जम्मू-पठाणकोट महामार्गावर आंदोलन करण्यासाठी आलेल्या तरुणांनी शुक्रवारी महामार्ग बंद केला.

हिमाचल प्रदेशातील उना येथे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या पक्षाच्या बैठकीबाहेर गोंधळ.

अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी पश्चिम बंगालमधील हावडा ब्रिजवर आंदोलक जमले.

उत्तराखंडच्या हल्दवानीमध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली.

तेलंगणामध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला. 13 जखमी झाले. सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर ट्रेन जाळण्यात आली. 30 जणांना अटक करण्यात आली.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये गुरुवारी बिर्ला नगर रेल्वे स्थानकाची तोडफोड करण्यात आली आणि भिंड-इंदूर-रतलाम इंटरसिटी आणि बुंदेलखंड-एक्स्प्रेसमध्ये दगडफेक करण्यात आली.

ओडिशाच्या कटक जिल्ह्यात महानदीच्या काठावर असलेल्या आंदोलकांनी सैन्य भरती शिबिरावर हल्ला केला. आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा