मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरला पाकिस्तानने केली अटक

मुंबई, 25 जून 2022: 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीर याला पाकिस्तानने अटक केली आहे. लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने साजिद मीरला 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, असे दहशतवादाशी संबंधित एका वरिष्ठ वकिलाने सांगितले. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ही शिक्षा टेरर फंडिंग प्रकरणात देण्यात आली आहे.

एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत साजिद मीरचा समावेश आहे. पाकिस्तानने नेहमीच साजिद मीरची उपस्थिती नाकारली आहे. त्याचा मृत्यू झाल्याचा दावाही पाकिस्तान सरकारने केला होता. साजिदला ताब्यात घेऊन पाकिस्तानला दहशतवादावरील डाग पुसायचा आहे, असे बोलले जात आहे.

अमेरिकन एजन्सी एफबीआयने साजिद मीरवर पाच मिलियन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश जवळपास एक दशकापासून त्याचा शोध घेत आहेत. साजिद मीर हा UN प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. साजिद मीर हा मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सुत्रधार आहे. या हल्ल्यात सुमारे 170 लोक मारले गेले. यामध्ये प्रामुख्याने भारतीय, सहा अमेरिकन आणि जपानसह अनेक ठिकाणच्या पर्यटकांचा समावेश होता.

पाकिस्तानने अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही

निक्केई एशियाच्या अहवालानुसार, एफबीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, साजिद मीर पाकिस्तानमध्ये जिवंत आहे, कोठडीत आहे आणि त्याला शिक्षा झाली आहे. एका माजी पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानने भारत आणि अमेरिकेला सांगितले की मुंबई हल्ल्यातील आरोपी साजिद मीर एकतर मरण पावला आहे किंवा त्याचा ठावठिकाणा माहित नाही. मात्र, मीरच्या अटकेबाबत पाकिस्तानने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. उप परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी निक्केई एशियाला सांगितले की, त्या या विशिष्ट प्रकरणात भाष्य करणार नाहीत.

साजिद मीर हा मुंबई हल्ल्याचा प्रोजेक्ट मॅनेजर आहे

एफबीआयचा दावा आहे की मीरने 2008 ते 2009 दरम्यान डेन्मार्कमधील वृत्तपत्र आणि त्याच्या कर्मचार्‍यांवर दहशतवादी हल्ल्यांचा कट रचला होता. 2011 मध्ये शिकागो कोर्टाने त्याच्यावर दहशतवादाचा आरोप लावला होता. डिसेंबर 2021 मध्ये, यूएस स्टेट डिपार्टमेंटने मुंबई हल्ल्याचा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून साजिद मीरचे नाव दिले. तो पाकिस्तानात मुक्तपणे राहतो, असेही सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा