मुंबई , 25 जून 2022: विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार फोडले आहेत. यावर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी मागणी केली आहे. काल या बाबत एक महत्त्वपूर्ण बैठक देखील पार पडली. बैठकीनंतर अशी माहिती समोर आली की सोमवारपासून याबाबत सुनावणी सुरू होऊ शकते. इतकंच नाही तर सुनावणीदरम्यान आमदारांना प्रत्यक्ष हजर देखील राहावं लागणार आहे.
अरविंद सावंत यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, सर्व बंडखोर आमदार दूर गुवाहाटीला जाऊन लपलेले आहेत आणि आम्हीच शिवसेना असल्याचे सांगत आहेत. मात्र वस्तुस्थिती अशी आहे. उद्धव ठाकरे यांनी अतिशय उदार भावनेनं सांगितलं होतं की मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. वर्षा बंगला सोडून खुर्चीचा मोह नाही हे दाखवून दिलं. त्यानंतर परत येण्याचं आवाहनही केलं गेलं. मात्र आज त्यांनी त्यांचे सर्व दरवाजे बंद केले.
पुढं ते म्हणाले की, बंडखोर आमदार आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळं आता त्यांना भाजपची साथ धरावी लागणार आहे. आम्ही बंडखोर आमदारांना पत्र लिहिलं होतं. याला त्यांच्याकडून प्रतिसाद आला. यावर पुन्हा आम्ही पत्र दिलं होतं. मात्र त्यांच्याकडून येणारं पत्र हे खोटं आहे. त्यांच्यापैकी कोणाच्याही मेलवरून हे पत्र आलेलं नाही. हे सर्व पाहता आम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. येत्या चार दिवसात कारवाई होऊ शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे