सिंध, ९ ऑगस्ट २०२२: पाकिस्तानातील सिंध प्रांतातील रोहरी येथे ९व्या मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुदमरल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. तर १०-१२ लोक बेशुद्ध झाल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बेशुद्ध झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचवेळी मृतांना तालुका रुग्णालयात नेण्यात आलं.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहरीमध्ये अरुंद गल्ल्या आहेत. या दिवसात हवामान देखील दमट आहे, त्यामुळे तेथील परिस्थिती बिकट झालीय.
लष्कराच्या तीन कंपन्या, १४०० पोलीस अधिकारी, २५० रेंजर्स, वॉक-थ्रू गेट्स आणि स्नॅप चेकिंगसह कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी १०-१२ पाळत ठेवणारे कॅमेरे लावण्यात आले होते.
मोहरमच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पाकिस्तानातील बहुतांश भागात सेल्युलर सेवा बंद करण्यात आली असून संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संवेदनशील भागात इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे