गौतम अदानींच्या नावावर पुन्हा नवा विक्रम, बनले जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली, ३० ऑगस्ट २०२२: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे भारतातील तसेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. काही वर्षांपूर्वी, जरी जगातील अनेकांना त्यांचं नाव माहित नसंल, परंतु आता संपूर्ण जग त्यांना ओळखत आहे. आता गौतम अदानी यांनी एकूण संपत्तीच्या बाबतीत एक नवा विक्रम केलाय. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी आता जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. असं करणारे अदानी हे पहिले आशियाई उद्योगपती आहेत.

अदानींच्या पुढं फक्त मस्क आणि बेझोस

ब्लूमबर्ग बिलिय यांनी अर्स इंडेक्सनुसार, अदानींनी आता लुई व्हिटॉनचे सीईओ आणि अध्यक्ष बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागं टाकलंय. निर्देशांकानुसार, अदानींची एकूण संपत्ती सध्या १३७.४ अब्ज डॉलर इतकी वाढली आहे. आता अदानी समूहाच्या अध्यक्ष गौतम अदानी त्यांच्या पुढं टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे आहेत. मस्कची एकूण संपत्ती सध्या २५१ अब्ज डॉलर आहे, तर बेझोस यांची सध्या १५३ डॉलर अब्ज संपत्ती आहे.

अदानींसाठी २०२२ हे लकी वर्ष

अलीकडच्या काळात अदानींची नेटवर्थ झपाट्याने वाढली आहे. जगभरातील शेअर बाजारात विक्रीचा कालावधी संपल्यानंतरही अदानींच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गेल्या २४ तासांत ज्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे अशा टॉप-१० श्रीमंतांच्या यादीत अदानी एकमेव व्यक्ती आहे. या कालावधीत अदानींची एकूण संपत्ती १.२ डॉलर अब्जने वाढलीय. अदानींसाठी हे वर्ष खूप लकी ठरलं आहे. जानेवारीपासून अदानींच्या मालमत्तेत ६०.९ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

गेल्या महिन्यात बिल गेट्स यांना टाकलं मागं

गेल्या महिन्यात बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकण्यापूर्वी गौतम अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून चौथ्या स्थानावर पोहोचले होते. गेट्स यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा समाजसेवेसाठी दान केला, ज्यामुळे त्यांची संपत्ती क्षणार्धात खूपच कमी झाली. दुसरीकडे, अदानींच्या कंपन्यांनी सातत्याने चांगली कामगिरी करत शेअर बाजाराला मात दिली, त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती वाढली आहे. आता गेट्स यांची संपत्ती ११७ अब्ज डॉलरवर आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा