नांदेड, ३१ ऑगस्ट २०२२: आगामी होणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार आणि माझ्याकडे दिलेल्या तीनही मतदारसंघात सर्वत्र भगवेमय वातावरण करणार असल्याचे शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी बोलतांना सांगितले.
आमदार नागेश पाटील अष्टीकर यांची नुकतीच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झाल्याने त्यांच्याकडे हदगाव हिमायतनगर, माहूर किनवट, भोकर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. या संपूर्ण मतदारसंघात आगामी होणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी यावेळी सांगितले.
कोण आहेत माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर?
नागेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ व जिल्हा परिषद, पंचायत समितीत मोठ्या प्रमाणात सदस्य निवडून आले होते. दस्तुरखुद स्वतः नागेश पाटील आष्टीकर हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आहेतच. नांदेड जिल्ह्यात शिवसेनेची राजकीय परिस्थिती पाहता केवळ हदगाव – हिमायतनगर मतदारसंघातच शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे.
माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिल्याने मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत मोठा जल्लोष केला जात असून कार्यकर्त्यांत मोठा उस्ताह दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे