ब्रिटनला मागं टाकत भारत बनला पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

नवी दिल्ली, ३ सप्टेंबर २०२२: अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर भारताला मोठं यश मिळालंय. ब्रिटनला मागं टाकत भारत आता जगातील ५वी मोठी अर्थव्यवस्था बनलाय. ब्रिटनची पाचव्या स्थानावरून सहाव्या क्रमांकावर घसरण झालीय. जगण्याच्या वाढत्या खर्चामुळे यूके सध्या कठीण काळातून जात आहे. अशा परिस्थितीत सहाव्या क्रमांकावर घसरणं हा तेथील सरकारसाठी मोठा धक्का आहे. एकेकाळी ब्रिटीश वसाहत असलेल्या भारताने २०२१ च्या शेवटच्या तीन महिन्यांत ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.

ही गणना यूएस डॉलरच्या आधारे केली जाते. याशिवाय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या आकडेवारीनुसार, भारताने पहिल्या तिमाहीत जीडीपीच्या आकडेवारीच्या आधारे आपली वाढ मजबूत केलीय.

ब्रिटनला मोठा धक्का

आर्थिक आघाडीवर ब्रिटनची घसरण हा तिथल्या नव्या सरकारला मोठा धक्का असंल. ब्रिटनमधील कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य लवकरच पंतप्रधानांची निवड करतील. अशा स्थितीत महागाई आणि सुस्त अर्थव्यवस्था हे नव्या सरकारसमोरचं सर्वात मोठं आव्हान असंल. दुसरीकडं, चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ७ टक्क्यांहून अधिक असू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

आव्हानं असूनही वेगवान

जर आपण भारत आणि ब्रिटनची अर्थव्यवस्था डॉलरमध्ये पाहिली तर IMF च्या आकडेवारीनुसार मार्च तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था ८५४.७ अब्ज डॉलर होती. त्याच वेळी, यूकेची अर्थव्यवस्था ८१६ अब्ज डॉलर होती. जगभरातील अर्थव्यवस्था मंदी आणि चलनवाढीच्या प्रभावाने त्रस्त असल्या तरी सर्व आव्हानांना तोंड देत भारतीय अर्थव्यवस्था वेगानं प्रगती करत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे.

जून तिमाही डेटा

या आठवड्यात जाहीर झालेल्या पहिल्या तिमाहीच्या अधिकृत GDP डेटानुसार, जून २०२२ च्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था १३.५ टक्क्यांच्या प्रभावी दराने वाढली. सर्व अंदाज भारताकडूनही अशाच आकड्याची अपेक्षा करत होते. जून तिमाहीत यूएस जीडीपी ०.६ टक्क्यांनी घसरला. यापूर्वी मार्च तिमाहीत, यूएस अर्थव्यवस्थेचा आकार १.६ टक्क्यांनी कमी झाला होता.

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ

यापूर्वी, आर्थिक वर्ष २०२१-२२ (Q4FY22) च्या चौथ्या तिमाहीत, भारताचं सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ४.१ टक्के दराने वाढलं होतं. संपूर्ण आर्थिक वर्षाबद्दल बोलायचं तर २०२१-२२ मध्ये जीडीपीचा विकास दर ८.७ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) च्या आकडेवारीनुसार, जून २०२२ च्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था १३.५ टक्क्यांनी वाढली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा