पुणे, १२ सप्टेंबर २०२२: रविवारी सायंकाळी पुणे शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. बावधन परिसरातून वाहणारी राम नदी दुथडी भरून वाहत आहे. येत्या दोन दिवसांत घाट भागात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलाय.
संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास हवामानात बदल झाला. मुसळधार पावसामुळं अनेक रस्त्यांचे तलावात रुपांतर झालं. बावधन परिसरात गोंधळाचं वातावरण होतं. गेल्या अनेक वर्षात राम नदीत इतका जोरदार प्रवाह पाहिल्याचे लोक सांगतात.
पावसामुळं पुण्यातील बावधन गावात सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. पाच फुटांपर्यंत पाणी भरलं आहे. त्यामुळं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की परिसरात उभ्या असलेल्या चारचाकी गाड्या ३० ते ३० फूट दूर वाहून गेल्या.
रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शेजारी भिंत कोसळल्याने पुणे-मुंबई महामार्गाला पुणे-कोकण महामार्गाला जोडणारा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यानंतर लोकांनी रस्ता खुला करण्यास सुरुवात केली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ जेसीबी बोलावून ढिगारा हटवून रस्ता पुन्हा खुला केला. यापूर्वी या मार्गावर पाणी साचल्याने अनेक वाहने अडकली होती. ज्यांना लोकांनी वाहून जाण्यापासून वाचवले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी पुणे शहर आणि लगतच्या भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळं २५ ठिकाणी पाणी साचले होते. तर १० ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. मात्र, कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पाषाण आणि मगरपट्टा येथे ५५.८ मिमी आणि ५५.५ मिमी पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
पावसाच्या या कहराचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अनेक लोक त्यांच्या वाहनांसह रस्त्यावर अडकलेले दिसतात. यादरम्यान काही लोक त्यांच्या मदतीसाठी पुढं येताना दिसले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे