पुणे, दिनांक ३० सप्टेंबर २०२२ : काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेतून निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी सुरुवातीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामध्ये लढत होणार असल्याचे चित्र तयार झाले होते. यानंतर गहलोत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे नाव आघाडीवर आले. परंतु आता दिग्विजय सिंह यांनीही निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाला परत एकदा गांधी घराण्यातूनच अध्यक्ष मिळणार ?
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून, गांधी घरान्या विरहित अध्यक्ष पक्षाला मिळणार असल्याची चर्चा होती. राहुल गांधींनी अध्यक्ष पद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर अशोक गहलोत आणि शशी थरूर ही दोन नावे अध्यक्ष पदासाठी चर्चेत आली होती. अशोक गहलोत यांनी निवडणूक लढण्याचे जाहीर केल्यानंतर राजस्थान मधील मुख्यमंत्री पदाच्या वादावरून मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये कलह सुरू झाला. राजस्थानच्या ८२ आमदारांनी राजीनामा दिला. या वादावर सोनिया गांधींशी दोन्ही नेत्यांची चर्चा झाल्यावर पडदा पडला आणि अशोक गहलोत यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढणार असल्याचे चित्र तयार झाले. परंतु आता दिग्विजय सिंह यांनी आपण आयुष्यभर काँग्रेस पक्षासाठी काम केले आहे आणि करत राहील. त्यामुळे खर्गे यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा विचार करत नसल्याचे सांगत निवडणुकीतून माघार घेतली आहे.
सोनिया गांधी या १९९९ पासून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आहेत. केंद्रामध्ये २०१४ ला मोदी सरकार सत्तेत आले. तेव्हापासून काँग्रेस पक्षात मोठी पडझड आणि अंतर्गत कलह पाहायला मिळाले आहेत. काँग्रेसमध्ये नव्याने होऊ घातलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडीतून पक्षाच्या तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला उभारी देऊन, पक्षाला नव संजीवनी देण्याची आव्हानात्मक जबाबदारी नवीन अध्यक्षावर असणार आहे. काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून अपवाद वगळता प्रदीर्घकाळ गांधी घराण्यातील व्यक्ती अध्यक्षपदी राहिलेली आहे. अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत एकापाठोपाठ एक नेते यातून माघार घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गांधी घराण्यातूनच काँग्रेस पक्षाला अध्यक्ष मिळणार का ? हे पहावे लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर