मुंबई, १० ऑक्टोबर २०२२ : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण पक्षचिन्ह गोठावले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना आता नवे चिन्ह आणि नाव घ्यावे लागणार आहे. ठाकरे गटाने त्रिशूल, उगवता सूर्य, आणि मशाल ही तीन चिन्ह आणि पक्षासाठी तीन नावांचा प्राधान्यक्रमानुसार पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. तर आता शिंदे गटाकडून निवडणूक चिन्हासाठी तलवार, तुतारी आणि गदा या चिन्हांची नावे समोर आली आहेत. आता दोन्ही गटांना कोणते चिन्ह आणि नाव मिळणार याचा निर्णय निवडणूक आयोग आज घेणार आहे.
निवडणूक आयोगाकडून आज दुपारी एक वाजेपर्यंत याबाबतचे पर्याय देण्याच्या सूचना ठाकरे आणि शिंदे गटांना दिल्या आहेत. ठाकरे गटाने पर्यायी नावे आणि चिन्हे सादर केली आहेत. परंतु शिंदे गटाने अद्याप ती सादर केली नाहीत. त्यामुळे, निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीमध्ये शिंदे गट पर्यायी चिन्हे आणि नावे सादर करणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाची भूमिका ठरवण्यासाठी रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. निवडणूक चिन्हासाठी तलवार, तुतारी आणि गदा या चिन्हांची नावे समोर आली आहेत. या बैठकीला शिंदे गटातील सर्व मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक आयोगाला कोणती तीन नावे आणि तीन चिंन्हे सादर करायची याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर