पुणे, २३ ऑक्टोबर २०२२: जगात नाव कमावणे सोपे नाही. जागतिक विक्रमात नाव नोंदवण्याकरता काहीतरी करून दाखवणे, हे आणखी कठीण काम आहे. पण काहीतरी वेगळे, काहीतरी अनोखे करणे तुम्हाला वेगळी ओळख मिळवून देऊ शकते आणि लोकांच्या नजरेत तुम्ही हिरो होता. अशी एक व्यक्ती आहे तिला निसर्गाकडून असे डोळे मिळाले आहेत, ज्याचा वापर करून तो लोकांना घाबरवतोच, पण त्याच्या डोळ्यांच्या जोरावर त्याने ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ही केला आहे.
Sidney loves to scare people on the street with his incredible eye-popping ability! 👀 pic.twitter.com/QpBJXmh9tJ
— Guinness World Records (@GWR) October 19, 2022
सिडनी डी कार्व्हालो असे या माणसाचे नाव असून, सिडनी आपल्या डोळ्यांची बुबुळ पूर्णपणे बाहेर काढू शकतो. ते पाहून कोणीही घाबरेल. पण त्याला ही प्रतिभा निसर्गाकडून मिळाली आहे. आणि त्याचमुळे तो जगात प्रसिद्धी मिळवत आहे. काचेच्या गोट्यांसारखे त्याचे डोळे पाहून तुम्ही देखील घाबराल…
सिडनी आपल्या डोळ्यांची बुबुळ बाहेर काढून लोकांचे केवळ लक्ष वेधून घेत नाही, तर या कलेमुळे सिडनीच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या २०२३ च्या आवृत्तीमध्ये देखील सिडनीला जागा मिळाली आहे. गेल्या वर्षी १० जानेवारीला सिडनीने ब्राझीलच्या साऊथ पॉल्समध्ये डोळे काढण्याचा पराक्रम करून दाखवला. त्यानंतर एका ऑप्टोमेट्रिस्टने प्रोप्टोमीटर नावाच्या यंत्राने सिडनी कार्व्हालोच्या डोळ्याचा विस्तार मोजला आणि त्यानंतर त्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, सिडनीने २००७ मधला १.२ सेमीचा विक्रम मोडला.
…. आणि स्वप्न पूर्ण झाले
सिडनीच्या मते, हे कौशल्य म्हणजे त्याला त्याच्या आई वडिलांबरोबर देवाकडून मिळालेली ही देणगी आहे, असे तो मानतो. चेहऱ्याच्या स्नायूंचा वापर करून सिडनी १.८ सेमी पर्यंत डोळ्यांची बुबुळ बाहेर काढण्यास सक्षम आहे. विश्वविक्रमात नाव नोंदवल्यानंतर सिडनी म्हणाला की, मला इतका आनंद झाला आहे की मी तो शब्दात व्यक्त करू शकत नाही. माझ्यासाठी माझे एक स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.