नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर २०२२ : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर जागतिक वायु गुणवत्ता निर्देशांकाचा अहवाल शेअर केला. ते ट्विटमध्ये म्हणाले की, आशियातील सर्वाधिक प्रदूषित १० पैकी ८ शहरे भारतातील आहेत आणि दिल्ली या यादीत नाही. काही वर्षांपूर्वी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर होते. पण आता यापुढे ते असणार नाही. या यशा साठी दिल्लीच्या लोकांनी खूप मेहनत घेतली.
भारतामधील,आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम हे एकमेव शहर आहे जे सर्वोत्तम हवेची गुणवत्ता असलेल्या टॉप १० मध्ये येते. वर्ल्ड एअर क्वालिटी इंडेक्सने(AQI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आठ भारतीय शहरे आशियातील टॉप १० सर्वात खराब हवेच्या गुणवत्तेच्या क्षेत्रांच्या यादीत आहेत. हवेची गुणवत्ता सर्वात खराब असणाऱ्या शहरांमध्ये, गुरुग्राम हे ६७९ ऐवढ्या AQI ने पहिल्या स्थानावर आहे. तर रेवाडीजवळील धरुहेरा शहराचा AQI हा ५४३ असून हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बिहारमधील मुझफ्फरपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे ३१६ AQI नोंदवण्यात आला. याशिवाय, लखनऊच्या तालकटरमध्ये AQI २९८, DRCC. बेगुसराय येथे AQI २६९, देवास येथे AQI २६६, कल्याण येथे AQI २५६, छपरा येथे AQI २३९ नोंदवण्यात आला.
साधारणतः शून्य ते ५० मधील AQI चांगला, ५१ ते १०० समाधानकारक, १०१ आणि २०० मध्यम, २०१ आणि ३०० खराब, ३०१ आणि ४०० अत्यंत खराब, सर्वोच्च म्हणजे ४०१ ते ५०० दरम्यानची परिस्थिती वाईट आणि चिंताजनक आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल जनतेला उद्देशुन पुढे म्हणाले की, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. जगातील सर्वोत्तम शहरांमध्ये दिल्लीला स्थान मिळावे यासाठी आपण कठोर परिश्रम करत राहू.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे