सप्तर्षी माळी लिखित ज्ञानज्योती बालनाट्यास उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा राज्य पुरस्कार

कोल्हापूर,२० नोव्हेंबर २०२२ : कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेच्या उत्कृष्ट बालसाहित्य निर्मितीच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात नाशिक येथील सप्तर्षी माळी लिखित ज्ञानज्योती बालनाट्याची उत्कृष्ट बालसाहित्य निर्मितीच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ‘ज्ञानज्योती’ हे बालनाट्य ‘अक्षरबंध प्रकाशना’ने प्रकाशित केले आहे.

मराठी बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष चंद्रकांत निकाडे व उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत पाटील यांनी यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कोल्हापूर येथे लवकरच एका साहित्यिक कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

ज्ञानज्योती बालनाट्यास नुकताच हिंगोली येथील ‘समृद्धी प्रकाशना’चा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झालेला आहे; तसेच ‘ज्ञानज्योती’ या बालनाट्याचे बेळगाव येथील काॅमन टच नाट्यसंस्थेतर्फे मराठी आणि कानडी भाषेत रंगमंचावर सादरीकरण होत आहेत.

सप्तर्षी माळी यांचे ‘निमित्त’ व ‘फिंद्री’ कथासंग्रह नाशिकच्या अक्षरबंध प्रकाशन संस्थेने यापूर्वीच प्रकाशित केले आहेत. सप्तर्षी माळी यांच्या साहित्यकृतीला मिळालेला हा १६ वा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. याबद्दल साहित्य वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा