पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ

पुणे, २९ नोव्हेंबर २०२२ : पुण्यात सध्या अपघातांची वेगळीच मालिका सुरू आहे. त्यातूनच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी २०२२ ते सप्टेंबर २०२२ या ९ महिन्यांच्या कालावधीत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर १४५ अपघातांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४४ अपघातांची गंभीर स्वरूपाची नोंद पोलिसदप्तरी झाली आहे. या अपघातांमध्ये एकूण ४७ प्रवाशांनी स्वतःचा जीव गमावला. या सततच्या अपघातांचे मुख्य कारण काय व ते कसे थांबवता येतील याचा विचार करणे आता महत्त्वाचे आहे.

मागील काही महिन्यानत वेगमर्यादा न पाळणाऱ्या जवळपास ७,३२५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान १ कोटीपेक्षा अधिक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण मार्गावर आता सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. तरीही चालकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली दिसत नाहीये. आणि हीच बाब चिंताजनक आहे. वाढते अपघात रोखण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर उभे राहिले आहे. आणि म्हणूनच वाहतूक पोलिसांनी नियमांचे पालन न करणाऱ्यांकडून दंड आकारण्यास सुरवात केली. वाहतूक पोलिसांच्या सक्रियतेमुळे मोठा दंडही वसूल करण्यात आला होत; मात्र ही कारवाई आता पुन्हा थंडावल्याने सर्रासपणे वाहतूक नियम पाडळी तुडवले जात असल्याचे चित्र द्रुतगती मार्गावर पाहायला मिळते आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर अपघात होण्याचं प्रमुख कारण हे वाहनचालकांचा बेशिस्तपणा. लेन कटिंग केल्यामुळे आणि लेनची शिस्त न पाहिल्यामुळे बहुतांश अपघात झाले आहेत असं समोर येतंय. या वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहनचालकांनीही शिस्त पाळण्याची गरज आहे. वेळोवेळी अपघातांचे प्रमाण चिंताजनक असल्याचा मुद्दा उपस्थित केला जातो. त्यानंतर एक्स्प्रेस हायवेवरील होणारी वाहतूक नियमाप्रमाणे व्हावी, यासाठी काटेकोर उपाययोजनाही राबवल्या जातात. तरीही वारंवार होणाऱ्या या अपघातांचं कारण वाहनचालकांचा बेशिस्तपणा असल्याचं समोर आलंय, हेही तितकेच खरे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा