छोट्या पडद्यावरील ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ मालिकेतून अभिनेता मकरंद अनासपुरे येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे, २९ डिसेंबर २०२२ : मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेता म्हणून मकरंद अनासपुरे यांना ओळखलं जातं. मकरंद अनासपुरे यांची त्यांच्या अभिनयाने, त्यांच्या हसण्याने महाराष्ट्राला एक वेगळीच ओळख आहे. आता ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत आहेत. लवकरच टीव्हीवर एक अनोखी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या लेखक-दिग्दर्शक जोडीच्या नव्या मालिकेचं नाव ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ हे असून, ही वेगळ्या विषयाची आणि धाटणीची मालिका असल्याचे निर्माते सांगतात.

विशेष म्हणजे या मालिकेत प्रमुख भूमिकेत मकरंद अनासपुरे पाहायला मिळणार आहेत. दिनकर त्र्यंबक गुळस्कर असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून, ते पात्र पोस्ट ऑफिसच्या पार्सल विभागात गेली १७ वर्षे कार्यरत असल्याचं दाखविण्यात येणार आहे. मकरंद अनासपुरे यांना अनेक वर्षांनंतर पुन्हा टीव्ही मालिकेत पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी वेगळी पर्वणी असेल. आजवरच्या सिनेमांमध्ये आपण पाहत आलेला त्यांचा विशेष अंदाज आपल्याला ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

नव्या भूमिकेविषयी मकरंद अनासपुरे सांगतात, ”मी इतकी वर्षे छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या धाटणीचे कार्यक्रम केले. गेल्या काही वर्षांत मी काल्पनिक कथा असलेल्या मालिकेत काम केलं नव्हतं. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांचीदेखील ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही पहिलीवहिली दैनंदिन मालिका आहे; तसेच या मालिकेत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकार आहेत. अनेक तरुण कलाकार आमच्याबरोबर आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव वेगळा आणि विलक्षण आहे.” या मालिकेत मकरंद यांच्यासह प्रेक्षकांचे लाडके विनोदवीर समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, प्रभाकर मोरे, ईशा डे, दत्तू मोरे हे असतील.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा