पुणे, ४ डिसेंबर २०२३ : वर्ष २०२३ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील ‘ट्वेंटी २०’ मालिकेला मंगळवारपासून (ता. तीन जानेवारी) सुरवात झाली. या मालिकेतील पिला सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. त्यात भारतीय संघाने २ धावांनी थरारक विजय मिळविला. अक्षर पटेलने टाकलेल्या शेवटच्या जादुई षटकाने भारताला विजय मिळवून दिला.
पदार्पणाच्या सामन्यात शिवम मावीने ४ बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २० षटकांत १६० धावांपर्यंत पोचला. शिवम मावीने चार, तर उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरवात निराशाजनक झाली. १२ धावांवर त्यांना पहिला धक्का बसला. सलामी फलंदाज निसांका अवघ्या एका धावांवर बाद झाला. त्यानंतर २४ धावांवर दुसरी विकेट गेली, तर ५१ धावांत श्रीलंकेचे ४ फलंदाज तंबूत परतले. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंका संघाच्या ठराविक अंतरावर विकेट पडत गेल्या. श्रीलंकेकडून कर्णधार दसुन शनाकाने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. त्याशिवाय वानंदु हसरंगा २१, चामिरा करुनारत्ने २३, तर कुसर मेंडिसने २८ धावांची खेळी केली; पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
तत्पूर्वी, श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतालाही सुरवातीला धक्क्यांवर धक्के बसले. सलामीवीर शुभमन गिल ७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर फॉर्मात असणाऱ्या सूर्यकुमार यादव याला चामिरा करुणारत्ने याने तंबूचा रस्ता दाखविला. संजू सॅमसनलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. संजू ५ धावा काढून परतला. इशान किशन आणि हार्दिक पांड्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला; पण इशान किशन आणि हार्दिक एकापाठोपाठ एक बाद झाल्यानंतर भारताच्या अडचणी वाढल्या. अखेर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरत भारताला सन्माजनक धावसंख्या उभारून दिली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील