पुणे, २३ जानेवारी २०२३ : औरंगाबादमधील जायकवाडी धरण परिसरात धरणाच्या समोर असलेल्या पुलावरून कार थेट पाण्यात कोसळली. वाहनाची काच फोडून तीन जणांना बाहेर काढण्यात आले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही; मात्र पाण्यात कोसळल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. पैठण शहरातून दक्षिण जायकवाडी, खुले कारागृह जुने कावसान शेवगाव कडे जाणाऱ्या नाथसागर धरणाच्या समोर असलेल्या पुलावर रविवारी (ता. २२) दुपारी ही घटना घडली.
पैठण शहरातून शेगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाथसागर धरणाच्या समोर वाहतुकीसाठी पूल आहे. या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची मोठी वर्दळ सुरू असते; मात्र येथील पुलावर सुरक्षेच्या दृष्टीने कठडे बसविलेले नाहीत. दरम्यान, रविवारी (ता.२२) दुपारी जुने कावसान येथील उद्धव भगवान मापारी, वर्षा उद्धव मापारी, राम अरुण चेडे हे कारने (एमएच-२०, एनजे- २७७८) प्रवास करीत होते; मात्र अचानक त्यांची कर पुलावरून गोदावरी नदीच्या पाण्यात कोसळली.
कार पुलावरून कोसळल्याचे दिसतात नागरिकांनी तत्काळ तिकडे धाव घेतली. नागरिकांनी पाण्यात उतरून कारची काच फोडून जखमी प्रवाशांना बाहेर काढले. यात जीवितहानी झाली नाही; मात्र कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या जायकवाडी धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आलेले आहे; तसेच पुलाखाली पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे कार पाण्यात पडल्यावर वाहून गेली नाही. उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे मोठा अनर्थ टळला. कारमध्ये अडकलेल्या तिघांची काच फोडून सुटका करण्यात आली. पाण्याचे प्रमाण जास्त असते तर जखमींना बाहेर काढणे कठीण झाले असते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील