मुंबई: राज्यात भाजपने अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला फटका बसला. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे, एकनाथराव खडसे नाराज आहेत.
दरम्यान एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात महायुतीचेच सरकार पुन्हा आले. मात्र अहंकारीपणामुळे आणि दोन पाऊल मागे न जाण्याच्या भूमिकेमुळे आज महाविकास आघाडीचे सरकार आले असल्याचे सांगत पक्षाचे काही चुकले नसून नेतृत्व चुकीचे असल्याचे सांगत पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
शिवसेनेशी चर्चा केली असती आणि दोन पाऊले मागे जाण्याची भूमिका घेतली असती तर आज राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री झाला असता असे खडसे यांनी म्हटले.
भाजपामुळेच पंकजा मुंडेंचा पराभव झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पंकजा मुंडे ह्या भाजपात नाराज असून लवकरच त्या भाजपला सोडणार अशी चर्चा आहे. चर्चेचे कारण देखील पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट ठरली आहे. फेसबुकवर मुंडे यांनी १२ तारखेला निर्णय जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. त्यातच आज खडसे यांनी मुंडे यांची भेट घेत चर्चा केली. या चर्चेत भाजपच आपल्या पराभवाला जबाबदार असल्याचे आमच्यात एकमत झाल्याचे खडसे यांनी सांगितले.
खडसे यांनी मला, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांना उमेदवारी न दिल्याने पक्षाचे संख्याबळ कमी झाले असून आम्ही असतो तर भाजपवर आज ही वेळ आली नसती असे खडसे यांनी सांगितले होते.
त्यावरून एकच चर्चा सुरु झाली. त्यातच आता पंकजा मुंडे या पक्ष सोडणार अशी चर्चा आहे, मात्र खुद्द पंकजा मुंडे यांनी मी भाजपा सोडणार नाही असे म्हटले आहे.