होळीपूर्वी मोठा झटका, घरगुती गॅसच्या दरात वाढ

नवी दिल्ली, १ मार्च २०२३: मार्च महिना सुरू झाला असून महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना मोठा धक्का बसलाय. होळीपूर्वीच घरगुती सिलिंडर महाग झाले आहेत. वास्तविक, १ मार्च रोजी घरगुती एलपीजी सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आलीय. आठ महिन्यांनंतर घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी, तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ३५० रुपयांची वाढ झालीय. ६ जुलै २०२२ पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती स्थिर होत्या. या वाढीनंतर सर्वसामान्यांना होळीपूर्वी महागाईचा झटका बसलाय.

आजच्या दिवसाबद्दल म्हणजे १ मार्च २०२३ बद्दल बोलायचं झालं तर, १७६९ रुपयांऐवजी, दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता ग्राहकांना २११९.५ रुपयांना उपलब्ध होईल. कोलकात्यात त्याची किंमत १८७० रुपये होती, जी आता २२२१.५ रुपये झाली आहे. व्यापारी शहर मुंबईत त्याची किंमत १७२१ रुपयांवरून २०७१.५० रुपयांपर्यंत वाढलीय. चेन्नईबद्दल बोलायचं झालं तर येथे १९१७ रुपयांना मिळणारा सिलेंडर आता २२६८ रुपयांना मिळणार आहे.

घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत

देशाची राजधानी दिल्लीत १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर आता १०५३ ऐवजी ११०३ रुपयांना मिळणार आहे. मुंबईत १०५२.५० ऐवजी हे सिलेंडर ११०२.५ रुपयांना मिळणार आहे, तर कोलकातामध्ये १०७९ ऐवजी आता ११२९ रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये आजपासून घरगुती एलपीजी सिलिंडर १०६८.५० रुपयांऐवजी १११८.५ रुपयांना मिळणार आहे.

पहिल्या तारखेचे पुनरावलोकन

एलपीजी सिलिंडर ग्राहकांसाठी महिन्याचा पहिला दिवस खास असतो हे लक्षात ठेवा. वास्तविक या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीचं पुनरावलोकन करून निर्णय घेतात. म्हणजेच महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरची किंमत वाढते किंवा कमी होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा