कर्नाटक १५ विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत भाजप आघाडीवर

बेळगाव: कर्नाटकमधील १५ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. १५ पैकी ११ मतदारसंघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे भाजप कर्नाटकात आपले अस्तित्व राखणार की पडणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

बेळगाव जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. गोकाकमध्ये माजीमंत्री रमेश जारकीहोळी हे काँग्रेस उमेदवार लखन जारकीहोळी यांच्यापेक्षा तब्बल १५ हजार मतांनी पुढे आहेत. कागवाड मतदारसंघात भाजपच्या श्रीमंत पाटील यांनी काँग्रेस उमेदवार राजू कागे यांच्यावर ६ हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली आहे. अथणी मतदारसंघात भाजप उमेदवार महेश कुमठळी यांनी कॉंग्रेस उमेदवार गजानन मंगसूळी यांच्यावर आघाडी घेतली आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राज्यात सत्ता टिकविण्यासाठी भाजपचे सात उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत भाजपचे ११ उमेदवार आघाडीवर आहेत.

दरम्यान, धर्मनिरपेक्ष जनता दल-काँग्रेस युती सरकार कोसळण्यास कारणीभूत ठरलेल्या व भारतीय जनता पक्षात प्रवेश करून निवडणूक लढलेल्या १५ अपात्र आमदारांचे भवितव्य यात ठरणार आहे. त्याचबरोबर राज्यातील भाजप सरकार तरणार की पडणार, याचाही फैसला होईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा