माझ्या पराभवानंतर दोन डझन आमदार-खासदार झाले, परंतु मी पात्र नाही, पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली खदखद

बीड, ३ जून २०२३ : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे त्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. त्यानंतर त्यांनी आज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथ गडावर जे भाषण केले त्यामध्ये त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. पंकजा मुंडे यांचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर राज्यात विधान परिषदआणि राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. परंतु त्यामध्ये मुंडे यांना संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीवेळी पंकजा यांच्या नावाची चर्चा झाली. परंतु त्यांना डावलण्यात आले.आज अखेर पंकजा मुंडे यांच्या संयमाचा बांध फुटला,आणि आपली खदखद व्यक्त केली. यावेळी त्यांनी भापन नेते अमित शाह हे माझे नेते आहेत. मी त्यांना भेटून मनमोकळे बोलणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

अनेक लोक निवडणुका हरले, परंतु त्यांना संधी दिली गेली.
मागील चार वर्षात कदाचित दोन डझन आमदार-खासदार झाले. त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर लोक चर्चा करणार. ही चर्चा मी ओढवलेली नाही. कारण माझ्या मनात दृढ विश्वास आहे असे सांगत, पंकजा मुंडे म्हणाल्या.मी राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोकपणे घेईल. आज (३,जून) पर्यंत ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या भूमिकांशी मी प्रामाणिक आहे. लोकांमध्ये, माध्यांमध्ये, विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची संधी मी दिलेली नाही असेही मुंडे म्हणाल्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या माझ्या माध्यमातील हितचिंतकांनो आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनो, मला जर भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुंडे अशीच तुम्हाला जाहीरपणे बोलवेल आणि तुमच्यासमोर भूमिका जाहीर करेल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालणारे खांदे अजून मला मिळालेले नाही. परंतु माझ्या खांद्याची रुंदी एवढी मोठी आहे की, अनेक बंदूका माझ्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी तसे होवू देणार नसल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा