इंद्रायणीच्या काठी लोटला वैष्णवांचा सागर ! माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला दोन ते अडीच लाख भाविक

आळंदी, ११ जून २०२३: टाळ-मृदंगाच्या टिपेला पोहोचलेला भक्तीकल्लोळ.. माऊली-माऊली असा अखंड जयघोष.. वैष्णवांच्या मेळ्याने बहरुन आलेला इंद्रायणीचा काठ.. माऊलींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा अशा वातावरणाने अलंकापुरी दुमदुमून गेली. यंदाच्या सोहळ्यात सुमारे दोन ते अडीच लाख भाविकांनी हजेरी लावली आहे. उष्णतेमुळे भाविकांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे.

आज पाहटेपासूनच वारकऱ्यांच्या राहुट्या व धर्मशाळांमधून अभंगाच्या सुरावटी निघू लागल्या आहेत. टाळ-मृदंगाच्या गजराने आसमंत भरुन गेला असून स्नानासाठी इंद्रायणीच्या तीरावर वारकऱ्यांची गर्दी केली होती. स्नानानंतर माऊलींच्या दर्शनासाठी लागलेली आस प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यांवर दिसून येत होती.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून दिंड्या आळंदीत दाखल झाल्या होत्या. दिंडीतील भाविकांनी इंद्रायणी घाटांवर फुगडीचा फेर धरला तर काहींनी टाळ मृदंगाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याचा आनंद लुटला.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा