मुंबई, १८ जून २०२३ : भाजप एकीकडे हिंदुत्वाच्या मुद्यावरून ठाकरे गटाला लक्ष्य करत असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या औरंगजेबच्या समाधीला भेट देण्यावरून आता नवा वाद उकरून काढण्यात आला आहे. यावर ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेला शिंदे गटाची टोळी म्हणून त्यांनी हिणवले आहे. शिंदे आणि त्यांची टोळी आणि फडणवीस आणि त्यांच्या टोळीला तुम्ही विरोधक म्हणत असाल तर आमच्या हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आम्ही या टोळ्यांना का दाखवू असा सवाल करुन चतुर्वेदी यांनी भाजप आणि शिवसेनेला खडे बोल सुनावले आहे.
काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाच्या युतीविषयी जोरदार चर्चा चालू होती. त्यावरूनच आता भाजपने ठाकरे गटावर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर आता ठाकरे गटाची भूमिका काय असणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्याच बरोबर आता ठाकरे गटाच्या हिंदुत्वाला हे मान्य आहे का असा सवालही त्यांनी केला होता. त्यावरूनच आता वाद पेटला असून ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भाजपला आणि शिंदे गटालाही त्यांनी सुनावले आहे.
खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेवर आणि भाजपवर टीका करताना हिंदुत्वाच्या मुद्यावरूनच त्यांनी शिंदे गटावर निशाण साधला आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्ता शिबिरामध्ये बोलताना आपल्या पक्षाची शिबिर चांगल्या पद्धतीने होत असून कोणीही पक्ष सोडून गेले तरी आम्हाला आता नवीन पदाधिकारी मिळत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. यावेळी त्यांनी मनीषा कायंदे या पक्ष सोडून का गेल्या यावर बोलताना सांगितले की, त्या का आणि कशामुळे गेल्या आहेत हे अद्याप माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या औरंगजेबच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेना आणि भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करुन ठाकरे गटावल हल्लाबोल केला होता. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, आमचे हिंदुत्वाचे सर्टिफिकेट यांना देण्याची गरज आम्हाला वाटत नाही. कारण आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आम्ही आमचे हिंदुत्वाचे सर्टिफिकेट त्यांना का देऊ असा प्रतिसवालही खासदार चतुर्वेदी यांनी केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर