मध्य प्रदेशातील छतरपूर येथे रजा न मिळाल्याने उपजिल्हाधिकाऱ्यांनी उपसले थेट राजीनाम्याचे अस्त्र

छतरपूर, मध्य प्रदेश २३ जून २०२३: समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती पहावयास मिळतात. राग हा उपजतच माणसाचा शत्रू आहे हे समजत असूनही माणसाकडून कळत नकळत चुका ही घडतात, परंतु मध्य प्रदेश छतरपूर येथे समोर आलेली घटना आश्चर्यचकित करणारी आहे. केवळ दुखावली गेल्याने एका उपजिल्हाधिकाऱ्याने थेट पदाचाच राजीनामा दिला, त्यामुळे या महिला अधिकाऱ्याच्या राजीनाम्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.

निशा बांगरे असे या उपजिल्हाधिकारीचे नाव आहे. त्यांनी केवळ क्षुल्लक कारणावरून थेट नोकरीच सोडली. सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. हे पत्र आता व्हायरल होतय, या पत्रातून त्यांनी धार्मिक भावनेला ठेच पोहोचल्याचे म्हटले आहे. घटनेची माहिती अशी कि, बांगरे यांनी नविन घर घेतलय. त्यासाठी त्यांनी गृहप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला, मात्र, त्यासाठी त्यांना विभागाकडुन सुट्टी देण्यात आली नाही. आपल्याच घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला सुट्टी मिळत नसल्याने बांगरे प्रचंड नाराज झाल्या, अस्वस्थ झाल्या. त्याच अस्वस्थतेतून त्यांनी थेट नोकरीचाच राजीनामा दिला.

त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहून मनातील वेदना बोलून दाखवली, तसेच विभागावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही केला. मला माझ्याच घराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही, त्यामुळे मी दु:खी झाली आहे. या कार्यक्रमात तथागत गौतम बुद्धांच्या अस्थि ठेवण्यात आल्या होत्या, त्या अस्थिंचेही मला दर्शन घेता आले नसल्याने माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे धार्मिक, आस्था आणि संवैधानिक अधिकाराशी तडजोड करून मी उपजिल्हाधिकारी पदावर राहू शकत नाही, ते मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी २२ जून २०२३ ला तात्काळ प्रभावाने पदाचा राजीनामा देत आहे, असे बांगरे यांनी म्हटले आहे.

निशा बांगरे यांनी विदिशातील सम्राट अशोक प्राद्योगिक संस्थेतून २०१०-२०१४ मध्ये इंजिनीअरींग केले. त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. पुढे त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी तयारी सुरू केली. त्यानंतर २०१६ मध्ये त्या एमपीपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांची उपजिल्हाअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०१७ मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून त्या राज्यातील विविध भागात आपली सेवा देत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा