मुंबई महापालिका अधिकाऱ्याच्या घरी सापडली कोट्यवधीची माया, ईडी मुसक्या आवळणार?

मुंबई २३ जून २०२३ : ईडीने मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा धाडसत्र सुरू केले आहे. मुंबईत आणि पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून ईडीने सोळा ठिकाणी छापेमारी केली. राजकीय नेते आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरी ही छापेमारी करण्यात आली. महापालिकेच्या तीन बड्या अधिकाऱ्यांसह ठाकरे गटाच्या एका नेत्याच्या घरी छापेमारी करण्यात आली. ही सर्व छापेमारी कोरोना काळात झालेल्या कोव्हिड सेंटरच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. या छापेमारीत एका महापालिका अधिकाऱ्याकडे कोट्यवधीची माया सापडली आहे. यामुळे खळबळ उडालीय.

मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरी ईडीने दोन दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. कोव्हिड काळातील घोटाळ्या संदर्भात ही छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत ईडीच्या हाती मोठे घबाड लागले आहे. ईडीने संजीव जैस्वाल यांच्या घरी छापेमारी केली असता १०० कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. जैस्वाल यांची १५ कोटींची फिक्स डिपॉझिट आहेत, त्यांच्या पत्नीकडे ३४ कोटींची संपत्ती आहे, तर मढ आयलंडला त्यांचा अर्ध्या एकरचा भूखंड आहे. या शिवाय जैस्वाल यांच्या घरात ईडीला १३ लाखाची रोख रक्कमही सापडली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जैस्वाल यांनी एवढी मोठी रक्कम घरात ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच जैस्वाल यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून? याचा तपासही ईडी करत आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्ताच्या घरी एवढ्या मोठ्या प्रमाणात माया मिळण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जातय. ईडीच्या छापेमारीनंतर जैस्वाल यांना काल चौकशीसाठी बोलावले होते, परंतु जैस्वाल ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नाहीत. त्यांनी ईडीकडे चार दिवसांचा वेळ मागितला आहे. चार दिवसानंतर जैस्वाल ईडीच्या कार्यालयात जातील, मात्र जैस्वाल यांच्या घरी मोठया प्रमाणात घबाड सापडल्याने त्यांच्या गळ्याभोवतीचा फास आवळला गेलाय, त्यामुळे ईडीच्या चौकशीत आणखी काय माहिती मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा