बकऱ्यांना उडवल्याच्या रागातून वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, तिघांना पोलिसांकडून अटक

नवी दिल्ली, १२ जुलै २०२३ : गोरखपूरहून लखनऊ येथे येणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसने अयोध्येजवळ, सहा बकऱ्यांना उडविल्याच्या रागातून पितापूत्रांनी वंदेभारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेत वेगवेगळ्या बोगीच्या चार खिडक्यांच्या काचा तुटल्याचे समजते. या प्रकरणात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. या प्रकरणात पिता-पुत्रासह एकाला अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे. याआधीही वंदेभारतवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तसेच वंदेभारतने गुरांना उडविल्याच्याही घटना घडल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ जुलै रोजी उत्तरप्रदेशच्या गोरखपूर स्थानकातून गोरखपूर-लखनऊ या वंदेभारतला हिरवा झेंडा दाखविला होता. गाडी सुरू झाल्यावर अवघ्या पाचच दिवसांनी दगडफेकीची घटना घडली आहे. या वंदेभारत एक्सप्रेसने सोहावल स्थानकाजवळ ९ जुलै रोजी सहा बकऱ्यांना उडविले होते. त्यामुळे संतापलेल्या मुन्नू पासवान आणि त्याच्या दोन मुलांनी अजय आणि विजय यांनी रागाच्या भरात वंदेभारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्याची माहीती आरपीएफने दिली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

गोरखपूरहून लखनऊला जाणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसवर दगडफेक करणाऱ्या मुन्नु पासवान आणि त्याच्या मुलांची चौकशी केली जात आहे. या दगडफेकीत कोणताही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त नाही. दगडफेकीने वंदेभारतच्या खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत. अचानक झालेल्या या दगडफेकीने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. आणि ट्रेनमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा