चोरी झालेला किंवा हरवलेला मोबाइल सापडू शकतो

पुणे, ३१ जुलै २०२३ : प्रत्येक महिन्याला अंदाजे ५० हजार मोबाइल फोन चोरीला जातात किंवा हरवतात मोबाईल चोरी झाल्यानंतर काय करावे हे अनेकांना समजत नाही. चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा मिळणार नाही अशी अनेकांची समजूत असते. मोबाईल चोरी झाल्यानंतर घाबरून जाण्याचे कारण नाही. काही आवश्यक गोष्टी केल्यानंतर तुमचा मोबाईल सापडू शकतो.

तुमचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर सर्वात प्रथम सीईआयआर (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) या वेबसाईटवर जा. या वेबसाईटवर नोंद केल्यास पोलीस स्टेशनमध्ये तातडीनं जाण्याची गरज नाही. या वेबसाईटच्या पहिल्या पेजवर तीन ऑप्शन दिले आहेत. यामध्ये मोबाईल चोरी झाल्यानंतर तो ब्लॉक करणे, आपला मोबाईल शोधण्याचे काम कुठपर्यंत आले त्याचे स्टेटस् चेक करणे आणि पुन्हा मिळाल्यास तो अनब्लॉक करणे, असे हे तीन ऑप्शन आहेत. मोबाईल चोरी झाल्यानंतर पहिला ऑप्शन वापरून हा मोबाईल ब्लॉक करावा लागतो. त्यामध्ये काही नंबर, हरवलेल्या मोबाईलचा आईएमईआई हा नंबर द्यावा लागतो. तो मोबाईल कधी, कुठून आणि कसा हरवला यासंदर्भात माहिती द्यावी लागते. त्यानंतर ही सर्व माहिती पोलिसांना मिळते.त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनमध्ये या मोबाईल चोरीची नोंद केली जाते. तसेच तुम्हाला यापैकी कोणताही पर्याय शक्य नसल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार करावी. ही तक्रार करण्यासाठी मोबाईलची पावती किंवा तो बॉक्स जपून ठेवणे आवश्यक आहे.

कसा शोधला जातो मोबाईल?
एखादा मोबाईल चुकून कुठे हरवला असेल आणि तो कुणी उचलला तर पोलिसांचा फोन आहे असं कळल्यावर संबंधित व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये फोन जमा करू शकतो मोबाईलची चोरी केली असल्यास ती व्यक्ती त्यामधील सीमकार्ड सतत बदलत असते, त्यावेळी आईएमआयई नंबरहून फोन शोधून काढता येतो.

दूरसंचार विभागाची नवी यंत्रणा काय?
२०१२ मध्ये जारी करण्यात आलेल्या दूरसंचार धोरणातच मोबाइल फोनची सुरक्षा, चोरी याबाबत चिंता व्यक्त करताना राष्ट्रीय पातळीवर अद्ययावत यंत्रणा उभी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मोबाइल फोन हे सध्या खूपच संवेदनशील उपकरण असून, तो चोरीला जाणे वा त्याचे क्लोनिंग करणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे उशिरा का होईना, केंद्र सरकारने इंटरनॅशनल इक्विपमेंट आयडेंटीफिकेशन रजिस्टर (सीआयईआर) आणि टॅफकॉप मोबाइल जोडण्यांबाबत माहिती देणारी यंत्रणा या सेवा १६ मे रोजी सुरू केल्या. मोबाइल फोन चोरीला गेला वा हरवला तर त्याचा गैरवापर टाळण्यासाठी संबंधित मोबाइलचा वापर करण्यावर बंदी आणणे आवश्यक असते. मोबाइल कंपन्या सिम कार्ड खंडित करतात. मात्र दूरसंचार विभागाने कार्यान्वित केलेली कृत्रिम गुप्तचर (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स) यंत्रणा संबंधित मोबाइल तात्पुरता वापरण्यावर बंदी आणतात. या यंत्रणेमुळे मोबाइलचा शोध घेणे शक्य असल्याचा दावा केला जात आहे. टॅफकॉपमुळे तुमच्या नावावर बनावट मोबाइल जोडणी नाही ना, याची माहिती घेता येते. ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर तब्बल १४ लाख ७८ हजार ३८५ तक्रारी नोंदवल्या गेल्या. त्यापैकी ६ लाख १३ हजार १३३ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. केंद्रीय दूरसंचार विभागाच्या संकेतस्थळावर ही सेवा उपलब्ध आहे.

ही सेवा कार्यान्वित झाल्यामुळे देशातील चोरीला गेलेल्या वा हरवलेल्या दोन लाख ७५ हजार २८ मोबाइलचा शोध लावण्यात आला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे त्यापैकी फक्त १७ हजार ८५० मोबाइल परत मिळाले आहेत. ही सेवा कार्यान्वित करण्यामागील हेतूच त्यामुळे सफल होऊ शकलेला नाही. या पद्धतीमुळे अशा सहा लाख ३५ हजार ३३१ मोबाइलचा पुनर्वापर रोखता आला आहे. त्याचवेळी यापैकी ५० टक्के मोबाइलचा शोध लावता आला आहे. याशिवाय नव्या सेवेमुळे ४० लाख बनावट मोबाईल शोधण्यात आले आहे. यापैकी २० लाख बनावट मोबाईल पश्चिम बंगालमधील आहेत. परंतु या प्रकरणी एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दूरसंचार विभागाच्या पद्धतीमुळे ४४ हजार ५८२ प्रकरणे उघड झाली असली तरी देशभरात फक्त १८१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ १५७५ प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आल आहे.

चोरी झालेला किंवा हरवलेला मोबाइल का मिळत नाही?
पोलिसांकडून तत्परता दाखविली जात नाही, हेच एकमेव कारण मोबाईल परत न मिळण्यामागे आहे. चोरीला किंवा हरविलेले मोबाइल दूरसंचार विभागाच्या नव्या यंत्रणेमुळे खंडित होत असल्यामुळे ते वापरता येत नाहीत. अशा वेळी फोनमधील भाग सुटे करून ते विकले जात आहेत. त्यामुळेही मोबाइल परत मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मोबाइल चोरीला किंवा हरवल्यास त्याचा तात्काळ शोध लागल्यानंतर तो लगेच ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी सक्रिय होणे आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा