राज्यात तब्बल २१ हजार बोगस सिमकार्ड? पोलिसांकडून गंभीर दखल घेत कारवाई सुरु

मुंबई, ५ ऑगस्ट २०२३ : मोबाईल हा माणसाचा अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईलसाठी कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड घेताना दूरसंचार विभागाने काही मर्यादा घातली आहे. यानुसार एका व्यक्तीला जास्तीत जास्त ९ सिम कार्ड घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावावर ९ पेक्षा जास्त सिम कार्ड असल्यास अशा ग्राहकांची सेवा बंद करण्याचे निर्देश दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. मात्र असे असतानाही एका व्यक्तीच्या नावावर एक दोन नव्हे तर तब्बल २१ हजार बोगस सिमकार्ड वितरित झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

भारत सरकारच्या टेलिकॉम विभागाच्या नियमानुसार एका व्यक्तीला आपल्या आधार कार्डवर एकूण ९ सिम कार्ड घेता येतात. पण, हे सर्व सिम फक्त एक व्यक्ती वापरू शकत नाही. त्यामुळे काही जणांनी अनधिकृतपणे अनेक सिमकार्डही घेतली आहेत. मात्र, याबाबत मूळ आधारकार्ड धारकाला याची माहिती नसते. राज्यात एकाच व्यक्तीच्या नावे आणि फोटोच्या आधारे शेकडो बोगस सिम कार्ड घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मे २०२३ मध्ये हा घोटाळा झाला असून राज्यात तब्बल २१ हजार बोगस सिमकार्ड असल्याची माहिती समोर आली आहे.

बोगस पध्दतीने घेतलेल्या या सिम कार्डचा वापर गुन्हेगारांकडून करण्यात येत असून याची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन कारवाई सुरु केली आहे. बनावट फोटो आणि कागदपत्रांचा वापर करून खरेदी केलेले राज्यातील २१,०३१ सिमकार्ड दूरसंचार विभागाने बंद केले आहेत.

बोगस सिमकार्ड वापराच्या अनुषंगाने राज्यातील ९ पोलीस विभागामध्ये एकूण १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी ४६ निष्पन्न आरोपींपैकी २५ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी १६६४ बोगस सिमकार्ड वितरीत केल्याची बाब तपासामध्ये उघड झाली आहे.

सायबर गुन्ह्यांमध्ये सामील असलेले हे सिमकार्ड ब्लॉक करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर क्राईम समन्वय केंद्राने ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. त्याअनुषंगाने पोलीस महासंचालक कार्यालयाच्या दिनांक ७ जुलै २०२३ रोजीच्या परिपत्रकान्वये या पोर्टलवर सायबर गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या सिमकार्डची माहिती दाखल करण्याच्या सूचना सर्व पोलीस विभागांना दिल्या आहेत अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा