पनवेल, रायगड १६ ऑगस्ट २०२३ : भाजपने दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा आपला पक्ष उभा करायला शिकावं, अशी टीका राज ठाकरे यांनी भाजपवर केली. यान चंद्रावर जाऊ शकत पण रस्ते नाही होणार. चांद्रयान जे चंद्रावर गेले आहे त्यांच्या आपल्याला काय उपयोग आहे, तिथले खड्डे बघायचे आहेत तर तेच यान पृथ्वीवर महाराष्ट्रात सोडले असते तर खर्च वाचला असता, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी खड्ड्यांवरुन सरकारवर टीकास्त्र सोडले. पनवेलमध्ये आज मनसेचा निर्धार मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात सत्तेत गेलो कारण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. कशाला खोटं बोलता, पंतप्रधानांनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्यांची आठवण करून दिली आणि ते भाजपसोबत गेले. मंत्री छगन भुजबळांनी पण सांगितलं असेल जेलमध्ये काय काय असतं. ते म्हणाले असतील जेल पेक्षा भाजपकडे गेलेलं बरं, अशी टीका राज ठाकरे यांनी अजित पवारांची नक्कल करत केली.
आधी नाणार मग बारसूच्या प्रकल्पाच्या नावाखाली, कोकणी माणसाच्या जमिनी कोणी बळकवल्या? याचा शोध घेतलाच गेला पाहिजे. जे आज खोके खोके ओरडत आहेत, त्यांच्याकडे कंटेनर आहेत. त्यांनी कोविड पण सोडला नाही. आणि निवडणूकीच्या वेळेस हे पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने भावनिक करुन मतं मागणार, अशी टीका राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर