रत्नागिरी १ जानेवारी २०२४ : मौजे रोवले व उंबरशेत येथे खाणकाम मध्ये चालणारे अवैध उत्खनन आणि नियमबाह्य वाहतुकीबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि दापोली प्रांताधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्वरित कारवाई करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज झालेल्या लोकशाही दिनात 12 अर्ज दाखल झाले होते. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, सर्वसाधारण उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राहूल देसाई आदी उपस्थित होते. तसेच क्षेत्रीय स्तरावरील उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जाबाबत माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. चौपदरीकरणामधील संपादित मोबदला देण्याबाबत भूसंपादन शाखेने त्वरित कार्यवाही करावी. पैसे भरुनही भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी न झाल्याने जाब विचारत जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित मोजणी करण्याबाबत सूचना केली.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतेही अर्ज प्रलंबित ठेवू नयेत. त्याला वेळेत उत्तरे द्यावीत. काही खोट्या तक्रारी दाखल झाल्याची शंका आल्यास, त्याबाबत चौकशी करुन, तपासून अशा अर्जदारांवर फौजदारी दाखल करावी, असे देखील जिल्हाधिकारी म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर