जालना, १५ जानेवारी २०२४ : जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात अवैध्यरित्या लाकडाची विनापरवाना वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. मंठा रोडवरून लाकडाचा अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर येत असल्याची गुप्त माहिती वन विभागाचे वनपाल राऊत आणि वनरक्षक घुगे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर वन अधिकाऱ्यांनी तात्काळ मंठा चौफुली परिसरात सापळा लावला असता, थोड्याच वेळात मंठा चौफुली परिसरातील अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आला. त्यांनी ट्रॅक्टरला थांबवून वाहतुकीच्या परवानाबाबत विचारपूस केली. पण त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे ट्रॅक्टर ड्रायव्हरने सांगीतले. यावरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ट्रॅक्टर ताब्यात घेतला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदरील कारवाई जालन्याचे वनपाल राऊत वनरक्षक घुगे यांनी केली.
जिल्ह्यात लाकडाची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरु राहणार असून जालना शहाराच्या चारही बाजूने असलेल्या बायपास रोडवर वन विभागाच्या वतीने फिल्डिंग लावलेली आहे. अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणारे वाहन आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वन विभागाच्या आधिकांऱ्याच्या वतीने देण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – विजय साळी