अंतरवाली सराटी ते मुंबई पायी मोर्च्याची रूपरेषा

जालना, १५ जानेवारी २०२४ : येत्या २० जानेवारीला अंतरवाली सराटी ते मुंबई असा मराठ्यांचा पायी मोर्चा निघणार आहे. त्यादरम्यान लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव मोर्चात सहभागी होणार आहे. या मोर्च्यात सहा मुक्काम असणार असून दररोज ७० ते ८० किलोमीटर पायी चालायचं नियोजन करण्यात आले आहे. या मोर्च्याची रूपरेषा कशी असणार आहे? याबद्दलची माहिती आज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली.

१) पहिला दिवस २० जानेवारी – सकाळी ९ वाजता जरांगे पाटील आपल्या समाज बांधवांसह अंतरवली सराटी वरून निघणार आहेत. दुपारपर्यंत पोळेगावजवळ पोहचण्याचा प्रयास करणार असून त्यांचा पहिला मुक्काम मातोरी, तालुका शिरुर या डोंगरपट्ट्यात असणार आहे.

२) दुसरा दिवस २१ जानेवारी – मातोरी ते करंजी असा प्रवास करणार आहे. दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी यामध्ये करण्याचे नियोजित केलं असून दुसरा मुक्काम करंजी घाट, बारा बाभळी येथे असणार आहे.

३) तिसरा दिवस २२ जानेवारी – करंजी घाटातून सकाळी ८ वाजता रॅली काढणार आहे. दुपारचं जेवण अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात करणार असून तिसरा मुक्काम रांजणगावात करणार आहे.

४) चौथा दिवस २३ जानेवारी – सकाळी रॅली काढणार आहे. कोरेगाव भीममध्ये दुपारचे जेवण आणि रात्री चंदननगर, खराडी बायपास येथे मुक्काम असणार आहे.

५) पाचवा दिवस २४ जानेवारी – सकाळी खराडी बायपास येथून निधणार आहे. तळेगाव दाभाडेमध्ये दुपारचं जेवण आणि रात्री लोणावळ्याला मुक्काम करणार आहे.

६) सहावा दिवस २५ जानेवारी – या शेवटच्या दिवशी लोणावळ्यामार्गे पनवेलला दुपारपर्यंत पोहचण्याचे नियोजन आणि रात्रीपर्यंत वाशी नवी मुंबई मध्ये पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे.

७) सातवा दिवस २६ जानेवारी – मुंबईमध्ये पोहचल्यावर २६ जानेवारीला आझाद मैदान आणि शिवाजीपार्क मध्ये आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे.

अशी कार्यक्रमाची रूपरेषा जरांगे यांनी सांगितली असून त्यांनी आपल्या समाज बांधवाना काही सूचनाही केल्या आहेत. त्यांच्यामते, ९ वाजता निघालो तर १२ पर्यंत चालण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. पण यावेळी ज्यांना पायी प्रवास करणे शक्य आहे त्यांनीच तो करावा. शक्य नसल्यास आपल्या वाहनात बसून राहावे. कारण पायी प्रवास महत्वाचा नसून समाजबांधवांची साथ महत्त्वाची आहे असे त्यांनी म्हटले आहे. आणि हे नियोजन अंतिम असून यात कोणताही बदल होणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे. तसेच सर्व समाजबांधवांनी या मोर्च्यास साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा