नांदगाव, २२ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले, परंतु मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची दिशा जाहीर केली.
जरांगे यांच्या आदेशानुसार काल रात्री नांदगाव मधील जुने तहसील,आंदोलन स्थळी सकल मराठा समाजाची बैठक बोलावली होती. जरांगे यांनी राज्य सरकारला आपल्या मागण्यांबाबत २२ व २३ फेब्रुवारी या दोन दिवसांची मुदत दिली आहे. त्यानुसार २४ फेब्रुवारीपासून ते २ मार्च पर्यंत दररोज तालुक्यात प्रत्येक गावात सकाळी १०:३० ते १:३० असे तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्याचे या बैठकीत जाहीर केले. या आंदोलनाचा दहावी-बारावीच्या परीक्षांवर परिणाम होता कामा नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी असेही सांगण्यात आले.
१ मार्चपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी नाही केली, तर २ मार्च रोजी वृद्ध, महिला व पुरुष यांनी आमरण उपोषणाला बसायचे आहे. उपोषणा दरम्यान काही बरे वाईट झाल्यास त्यास सरकार जबाबदार असेल. तसेच ३ मार्चला नासिक जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकच भव्य असा रस्ता रोको करायचा आहे असेही उपोषणकर्ते यांनी सांगितले आहे. नांदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी विशाल वडघुले व भास्कर झाल्टे यांनी १३ दिवसांपासून सुरु केलेल्या उपोषणाची सर्वांच्या साक्षीने ज्युस घेऊन सांगता करण्यात आली. परंतु दोन दिवस साखळी उपोषण सुरू राहील असेही सांगण्यात आले.
यावेळी झालेल्या बैठकीत शासनाने मराठा आरक्षणाच्या घोषणेबाबत नाराजी व्यक्त करत तालुक्यात विविध गावात दररोज रास्ता रोको आंदोलनाचा निर्धार केला आहे. मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले. यानंतर स्नेह भोजनाचा व जय बाबाजी भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
न्युज अनकट प्रतिनीधी : नाना आहिरे