मुंबई : मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना ठाकरे सरकारकडून बढती देण्यात आली आहे. अश्विनी भिडे आता प्रधान सचिव म्हणून काम बघणार आहेत.
अश्विनी भिडे या आरे मेट्रो-३च्या कारशेडच्या मुद्द्यावरून वाद राहिल्या आहेत. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर अश्विनी भिडे यांची बदली होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, ठाकरे सरकारने भिडेंना पदोन्नती दिली आहे. भिडेंना बढती दिल्याबरोबर एमएमआरसीएल आणि मेट्रो-३ चे संचालकपदही कायम ठेवले आहे. मुंबईतील आरे कारशेडमधील वृक्षतोडीवरून झालेल्या वादनंतर मेट्रो-३ च्या संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांना शिवसेनेने टीका केली होती.
मेट्रोच्या कारशेडच्या बांधकामासाठी रात्रीच्या वेळी झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यावेळी पर्यावरणप्रेमींनी रात्रीच्या वेळेस आरेत मोठे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवत अश्विनी भिडे यांच्यावर टीका केली होती. अश्विनी भिडे आणि आदित्य ठाकरे यांच्यात ट्विटर वॉर देखील रंगले होते.