विरार, २३ एप्रिल २०२१: नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे ऑक्सिजनअभावी २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना कालच घडली होती. या घटनेच्या एक दिवसानंतरच पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. विरारमधील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आज पहाटे ५ ते ५.३० च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होते. तर आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्ण उपचार घेत होते. यातील १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
सध्या ही आग पूर्णपणे विझवण्यात आली असून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. तसेच या रुग्णालयातील सर्व रुग्णांना वसई-विरार- नालासोपारा परिसरातील विविध रुग्णालयात हलवण्यात येत आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते, असेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवावा झाल्या आहेत. तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे