मुंबई: राज्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. कोणीही पॅनीक होऊ नये. अन्नधान्याचा पुरवठा हा सुरळीत होईल. घाबरुन जाऊ नका, खरेदीसाठी गर्दी करु नका. लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबई शहरासह राज्यभर भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना केल्या जात असताना संचारबंदीही लागू आहे. त्यामुळे अन्न आणि धान्य तसेच अत्यावश्यक सेवांसाठी राज्यातील पोलीस मदत करणार आहेत. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये. सर्व सुरळीत चालू राहिल. मात्र, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
संचार बंदी असताना नागरिक बाहेर पडू शकत नाही परंतु किती ही झाले तरी जीवनावश्यक गोष्टी टाळता येऊ शकत नाही. खण्या पिण्याच्या गोष्टींसाठी बाहेर पडणे लागणारच पण यातून ही गर्दी निर्माण होते व संसर्गाची भीती बळावते यावर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे जेणेकरून लोक घराबाहेर पडणार नाहीत.
मुंबईसह महाराष्ट्रातील पोलीस हे खाद्यान्न वस्तूंच्या होम डिलिव्हरीमध्ये मदत करतील. त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा आणि वस्तू आणि सुविधा पुरविण्यात येणार आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या होम डिलिव्हरीच्या सेवेला पोलिस सहकार्य करतील. या संदर्भात वितरण प्रतिनिधींना कोणत्याही समस्येस सामोरे जावे लागत असेल तर ते १०० नंबर डायल करु शकता, असे महाराष्ट्र पोलिसांनी म्हटले आहे.