अवतार-२ जगभरात हिट, ७२ तासांत ३५०० कोटींहून अधिक कमाई

Avatar 2 Box Office Collection, २० डिसेंबर २०२२: अवतारचे चाहते एक दशकाहून अधिक काळ त्याच्या सिक्वेलची वाट पाहत होते. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांना अशा जगाची ओळख करून दिली होती ज्यानं प्रत्येक पाहणाऱ्याच्या डोळ्याचे पारणे फेडले होते. त्याचबरोबर हे जग पाहण्याची आणि त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची आवडही त्यांच्या मनात निर्माण झाली. आता दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉननं अखेर त्याचा अवतार २ जगभरात रिलीज केलाय. यासोबतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धमाल सुरू केलीय.

पहिल्या वीकेंडमध्ये ३००० चा टप्पा पार

अवतार: द वे ऑफ वॉटर १६ डिसेंबर २०२२ रोजी जगभरात रिलीज झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी जगभरातून प्रेक्षक थिएटरमध्ये पोहोचत आहेत. रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटानं बक्कळ कमाई केलीय. यासोबतच अनेक रेकॉर्ड बनले आहेत तर काही मोडलेही आहेत. त्याचे बॉक्स ऑफिस रिपोर्ट्सही समोर आले आहेत. त्यांच्या मते, पहिल्या वीकेंडला अवतार २ ने जबरदस्त धमाका केलाय.

व्यापार विश्लेषक रमेश बाला यांच्या मते, अवतार २ ने जागतिक बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केलाय. पहिल्या आठवड्याच्या शेवटी, चित्रपटाने उत्तर अमेरिकेत १३४ मिलियन डॉलर, चीनमध्ये ५९ मिलियन डॉलर आणि उर्वरित जगामध्ये २४२ मिलियन डॉलर कमावले. यासह, चित्रपटाची एकूण कमाई ४३५ मिलियन डॉलर झालीय. भारतीय रुपयानुसार हा आकडा सुमारे ३,५९८ कोटी रुपये आहे.

भारतात सहा भाषांमध्ये प्रदर्शित

दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी त्यांचा एपिक सायन्स फिक्शन चित्रपट अवतार २ भारतात ६ भाषांमध्ये प्रदर्शित केला आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांचा समावेश आहे. हा चित्रपट 3D तसेच IMAX फॉरमॅटमध्ये रिलीज झालाय. भारतात या चित्रपटाने गेल्या तीन दिवसांत जवळपास १३३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

अवतार २ ने भारतीय बॉक्स ऑफिसवर ४१ कोटी रुपयांची कमाई केली. हॉलिवूडच्या सर्वात मोठ्या ओपनर चित्रपटांच्या यादीत तो दुसरा आलाय. पहिल्या क्रमांकावर अजूनही सुपरहिरो चित्रपट Avengers Endgame आहे, ज्यानं भारतीय बॉक्स ऑफिसवर ५३.१० कोटी रुपयांची कमाई केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा